संतोष पाटील आत्महत्या कर्नाटकातील भाजपच्या मंत्र्यावर गंभीर आरोप

0
270

बंगळुरू, दि. २१ (पीसीबी): कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणात कर्नाटकचे मंत्री ईश्वरप्पा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईश्वरप्पा यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला आहे. एफआयआरमध्ये ईश्वरप्पा यांचे सहकारी बसवराज आणि रमेश यांचीही नावं आहे. संतोष पाटील यांचे भाऊ प्रशांत यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

संतोष पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होतं. मंत्री ईश्वरप्पा कामाच्या बदल्यात आपल्याकडून ४० टक्के कमिशन मागत असल्याची तक्रार पाटील यांनी मोदींकडे केली होती. पाटील यांचं लिहिलेलं पत्र बरंच चर्चेत होतं. ईश्वरप्पा थकलेली बिलं चुकती करत नसल्याचा आरोप पाटील यांनी केला होता. ईश्वरप्पा खोटं बोलत असल्याचा, भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. माझे पैसे मिळवून द्या, अशी विनंती पाटील यांनी मोदींकडे केली होती.

ईश्वरप्पा यांनी पत्राबद्दल स्पष्टीकरण दिलं होतं. पाटील यांचे आरोप चुकीचे असल्याचं ईश्वरप्पा म्हणाले. त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याची धमकीदेखील त्यांनी दिली होती.

संतोष पाटील यांचा मृतदेह उडुपी शहरात सापडला. मृत्यूपूर्वी पाटील यांनी त्यांच्या मित्राला व्हॉट्स ऍपवर एक मेसेज पाठवला. माझ्या मृत्यूला मंत्री जबाबदार असल्याचं पाटील यांनी मेसेजमध्ये म्हटलं. ‘ईश्वरप्पा माझ्या मृत्यूला कारणीभूत आहेत. त्यांना शिक्षा व्हायला हवी. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि येडियुरप्पा यांनी माझ्या कुटुंबाची काळजी घ्या, असं माझं आवाहन आहे,’ असं पाटील यांनी मेसेजमध्ये म्हटलं होतं.