संतोष देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री : कोण आहे सुग्रीव कराड?

0
17

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांच्या जबाबात सुग्रीव कराडच्या नावाचा उल्लेख आला आहे. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून सरपंच संतोष देशमुख आणि गावातील लोकांनी सुदर्शन घुले याच्यासह मित्रांना मारहाण केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुग्रीव कराड नक्की कोण आहे? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील अनेक धागेदोरे आता समोर येत आहेत. या प्रकरणात आरोपींनी सुग्रीव कराड यांचं नाव घेतल्यामुळे तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत याप्रकरणी वाल्मीक कराडसह आठ आरोपीचीं चौकशी करण्यात आली आहे.सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून सरपंच संतोष देशमुख आणि गावातील लोकांनी सुदर्शन घुले आणि मित्रांना मारहाण केली होती.यां मारहाणीमुळे वाल्मिक कराड यांची लोकांमध्ये आणि बीडमध्ये बदनामी झाली. त्यामुळे सुदर्शन घुले याला वाल्मीक कराड यांनी या गोष्टीचा बदला घ्यायला सांगितलं होतं, असं जयराम चाटे याने जवाबात म्हटलं आहे. हा बदला घेण्यासाठी सरपंच संतोष देशमुख यांना उचलून त्याला चांगली अद्दल घडवायचं आहे, असा स्पष्ट उल्लेख जयराम चाटेच्या जवाबात आहे. त्यामुळे या प्रकरणात सुग्रीव कराडच्या नावामुळे नवीन ट्विस्ट आला आहे.

सुग्रीव कराड हा केज तालुक्याचा रहिवासी असून तो एका राजकीय कुटुंबातील आहे. त्याची आई केज पंचायत समिती सदस्य होत्या तर पत्नी नगरसेविका राहिल्या होत्या. मात्र त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याची माहिती समोर आली आहे तसेच त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्या गटासाठी काम करत होता. मात्र मागील लोकसभा निवडणुकीत त्याची भूमिका संशयास्पद राहिल्याने धनंजय मुंडे यांनी त्याला बाजूला केले होते. दरम्यान या प्रकरणात आरोपीच्या जबाबातून त्याच नाव आल्यानं तपासाला वेगळी दिशा मिळणार आहे.