संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट, पोलिस यंत्रणा अडकणार

0
31

बीड, दि. २८ –
संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने राज्यात खळबळ उडवली असताना, आरोपी सुदर्शन घुलेने दिलेल्या जबाबातून थरकाप उडवणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. त्याच्या सांगण्यानुसार, ही हत्या एका राजकीय सूडातून करण्यात आली असून, यामागे मोठा कट रचण्यात आला होता.


सुदर्शन घुलेच्या पोलिसांसमोर दिलेल्या कबुलीजबाबानुसार, वाल्मिक कराड हा त्यांच्या समाजाचा नेता असून विष्णू चाटे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष आहेत. स्वतः सुद्धा राष्ट्रवादीच्या गटाचा कार्यकर्ता असल्याचं घुलेनं सांगितलं. वाल्मिक कराडने सरपंचाला धडा शिकवायला सांगितल्यामुळेच त्यांनी संतोष देशमुख यांचे अपहरण केले.

अपहरण केल्यानंतर देशमुख यांना तब्बल दोन तास अमानुष मारहाण करण्यात आली. मारहाण सुरू असतानाच घुलेचा जयराम चाटेच्या फोनवरून विष्णू चाटेशी दोन-तीन वेळा संपर्क झाला. प्रतीक घुलेने धावत येत दोन्ही पायांनी देशमुख यांच्या छातीवर जोरात उडी मारली. त्यामुळे त्यांना रक्ताची उलटी झाली आणि ते बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना गाडीत टाकण्यात आले.

जयराम चाटेने त्यांचे काढलेले कपडे पुन्हा घातले. दिवसा लोकांच्या नजरेत न पडता मृतदेह लपवण्यासाठी त्यांनी अंधाराची वाट पाहिली आणि रात्रीच्या अंधारात दैठण फाट्याजवळ मृतदेह फेकून दिला. त्यानंतर ते स्कॉर्पिओ गाडीतून वाशीच्या दिशेने पळाले, पण पोलिसांना दिसल्यावर गाडी टाकून पळ काढला.

या घटनेत आणखी धक्कादायक बाब म्हणजे संतोष देशमुख यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून त्यांना अडकवण्याचा कट रचण्यात आला होता. घुलेने स्वतः विष्णू चाटेला सांगितले होते की, “उद्धा उचलून नेतो आणि बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवतो.” तिरंगा हॉटेलमधील एका बैठकीत या षडयंत्राची चर्चा झाली होती.

विष्णू चाटेने यावर उत्तर दिलं की, “तुला जे करायचं ते कर, नाहीतर गावाकडे चितर पाखरं आणि ससे सांभाळ, पण केजला येऊ नको.” संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर केज (Kej) पोलिसांनी हलगर्जीपणा दाखवत वेळकाढूपणा केल्याचा आरोप देशमुख यांचे चुलतभाऊ शिवराज देशमुख यांनी त्यांच्या जबाबात केला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे पोलिस यंत्रणाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.