संतापजनक! पाळीव कुत्र्याला आधी काठीने मारहाण, नंतर गळफास देऊन झाडाला लटकवलं

0
71

पुणे, दि. 23 (पीसीबी) : पुण्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाळीव कुत्र्याला अमानुष मारहाण करत त्याला गळफास देत मारल्याची घटना उघडकीस आली आहे. पाळायला आणलेल्या कुत्र्याला सांभाळणं शक्य होत नसल्यानं एका महिलेनं त्याला बेदम मारहाण केली आणि नंतर त्याला फास देऊन ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील पिरंगुट इथं ही घटना घडली आहे. या घटनेनंतर प्राणीप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी महिलेसह तिच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रतिभा विनायक जगताप यांनी कुत्र्याला काठीने बेदम मारहाण केली. त्यानंतर मुलाने कुत्र्याला दोरीने गळफास लावून झाडाला लटकवलं. या प्रकरणी मिशन पॉसिबल फाउंडेशनच्या वतीने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी प्रभावती जगताप आणि ओंकार जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पिरंगुट येथील प्रभावती आणि ओंकार यांच्या घरच्या कुत्र्यासोबत ही घटना घडली. आधी कुत्र्याला काठीने मारण्यात आलं आणि त्यानंतर त्याला गळफास देऊन त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी प्रभावती आणि ओंकार विनायक जगताप यांच्या विरुद्ध प्राणी क्रूरता अधिनियम नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, संबधित श्वान पिसाळला होता. त्यामुळे त्याला मारल्याचे कारण दिलं जात असल्याची माहिती आता समोर येते आहे. तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या एक्स वरून केली आहे. माणसं अशी कसं वागू शकतात. हे दृश्य पाहून धक्का बसला आहे. पुणे पोलिसांनी असं अमानुष वागणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.