संतापजनक ! अल्पवयीन मुलींना दारु पाजून; मित्राच्या खोलीवर नेवून सामुहिक बलात्कार

0
7

पुणे, दि. १९ (पीसीबी) : बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींना दारु पाजत पुण्यातील हडपसर परिसरातील त्यांच्या मित्राच्या खोलीत चौघांनी लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी बारामती पोलिसांनी तातडीने सूत्र हलवत तिघांना अटक केली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार असून त्याच्या मागावर पोलीस पथक आहेत.

उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. सुदर्शन राठोड यांनी याबाबत अधिक माहिती दिली. राठोड यांनी सांगितले की याप्रकरणी,
ज्ञानेश्वर भरत आटोळे (वय २७, रा. सावळ), अनिकेत प्रमोद बेंगारे (वय २०, रा. बयाजीनगर, रुई, बारामती) व यश उर्फ सोन्या शिवाजी आटोळे (वय २१, रा. सावळ, ता. बारामती) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

१४ सप्टेंबर रोजी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या फिर्यादी बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या दोन्ही मुली शहरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये नववीमध्ये शिक्षण घेत आहेत. परंतु त्या एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. त्या घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेल्या होत्या. पुण्यात एसटी बसने जाताना त्यांनी ज्ञानेश्वर आटोळे याच्याशी संपर्क साधला. त्याने हडपसर परिसरातील खोलीवर त्या दोघींना बोलावले. त्यानंतर दोघा मित्रांना या मुली येत असल्याचे सांगितले. मुलींपाठोपाठ तो आणि अन्य एकजण बारामतीतून हडपसरला पोहचले.

तेथे एका मित्राच्या खोलीवर या मुलींना नेण्यात आले. रात्री त्यांना दारु पाजून चौघा आरोपींनी आळीपाळीने दोघींवर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान यातील एका मुलीने हडपसरहून तेथील एका प्रवाशाच्या मोबाईलवरून तिच्या आईला फोन केला. आईने बारामती तालुका पोलिसांना याची माहिती दिली. त्यानुसार तालुका पोलिसांनी हडपसर पोलिसांशी संपर्क साधत मुलींना ताब्यात घेतले.

बारामतीतून महिला पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह एक पथक हडपसरकडे रवाना झाले. १६ रोजी या मुलींना पोलिसांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले. येथे त्यांचे महिला पोलिसांकडून समुपदेशन केले जात असताना या दोघींनी दारु पाजून चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली. त्यानुसार सुरुवातीला ज्ञानेश्वर याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून अन्य आरोपींची नावे निष्पन्न झाली. त्यानुसार बेंगारे व सोन्या आटोळे या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील चौथा आरोपी अद्याप फरार आहे. त्याच्या मागावर पोलीस पथक असून आज संध्याकाळी तो पोलिसांच्या हाती येण्याची शक्यता आहॆ.

या घटनेत दोन वेगवेगळ्या फिर्यादी दाखल झाल्या आहेत. एका घटनेत बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमासह अॅट्राॅसिटी, लैंगिक शोषण तर दुसऱ्या घटनेत लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बारामतीत खळबळ उडाली आहॆ .पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी बारामती भेटीत या प्रकरणाची माहिती घेत कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.