मुक्ताबाई देवस्थानाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार सुनील लांडगे यांना भागवत धर्मप्रसारक पुरस्कार प्रदान
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे केला सन्मान
पुणे , दि. ८ –पंढरपूर: महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संतांनी अध्यात्मिक लोकशाही निर्माण केली. संत विचारांनी महाराष्ट्र घडला. माणसाचे जीवन समृद्ध केले, असे मत संत मुक्ताबाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
जळगाव जिल्ह्यातील श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताबाई संस्थानतर्फे देण्यात येणारा यंदाचा राज्यस्तरीय भागवत धर्म पुरस्कार वितरण सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे रविवारी झाला. आषाढीवारीचे वार्तांकन आणि वारकरी संप्रदायासाठी योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील पत्रकारांना भागवत धर्म प्रसारक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. संस्थानचे माजी अध्यक्ष सहकारमहर्षी कै. भाऊसाहेब ऊर्फ प्रल्हादराव पाटील यांच्या स्मरणार्थ २०१९ पासून या पुरस्काराची सुरुवात केली आहे. या पुरस्कारासाठी देहू ते पंढरपूर वारी करणारे महाराष्ट्र टाइम्सचे पिंपरी चिंचवड प्रमुख सुनील लांडगे यांची निवड करण्यात आली होती.
….
‘पुंडलिक वरदे…’ चा गजर आणि रंगला पुरस्कार वितरण सोहळा
आषाढीला पंढरपुरातील वातावरण हे विठ्ठलमय झालेले असते. चंद्रभागेतिरी संतांची मांदियाळी जमलेली असते. तर अखंडपणे सुरू असणाऱ्या हरी गजराने चंद्रभागे तिरी भक्ती सागर लोटलेला असतो. अशा भक्तीमय वातावरणामध्ये संत मुक्ताबाई मठामध्ये पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी “पुंडलिक वरदे …, चा गजर झाला आणि देवस्थानाचे प्रमुख यांच्या हस्ते वारकरी संप्रदायातील मानाचा फेटा, तुळशीची माळ, उपरणे, श्रीफळ आणि श्री विठ्ठलाची मूर्ती देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी देवस्थानाचे अध्यक्ष रवींद्र उर्फ भैय्यासाहेब पाटील, संत मुक्ताबाई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, विश्वस्त पंजाबराव पाटील, संदीप पाटील, सम्राट पाटील, पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, उपाध्यक्ष शंकर टेमघरे, सचिव ॲड विलास काटे, खजिनदार मनोज मांढरे, विश्वस्त राजेंद्रकृष्ण कापसे, राजेंद्र मारणे, डॉ. विश्वास मोरे , जिल्हाध्यक्ष शहाजी फुर्डे पाटील, यशवंत सादुल, दत्तात्रय जोरकर , शशिकांत पाटील आदी उपस्थित होते.
…..
पुरस्कार हा वारीचा प्रसाद !
पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार सुनील लांडगे यांनी वारीचे अनुभव सांगितले. कृतज्ञता व्यक्त केली. लांडगे म्हणाले, ‘मुक्ताई प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेला हा पुरस्कार वारी आणि पांडुरंगाचा प्रसाद आहे. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला वारी काहीतरी देऊन जाते. पंढरीची वारी ही जीवन समृद्ध करणारी आहे.”
…
जीवाला देवाकडे नेणारी वारी !
हभप हरणे महाराज यांनी पुरस्काराची पार्श्वभूमी सांगितली. भागवत धर्मातील वारी हा सुख सोहळा आहे आणि हा सुख सोहळा वाढवण्यासाठी पत्रकारांनी अनमोल असे योगदान दिले आहे. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा वाढवण्यासाठी गेली २५ वर्ष सुनील लांडगे यांनी संतसेवक म्हणून भूमिका बजावली या भूमिकेचा सन्मान प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे. जीवनास देवाकडे आणि देवाला जीवाकडे आणणारी वारी आहे. ” अशी भावना महाराजांनी व्यक्त केली. सूर्यकांत भिसे यांनी गेल्या ३० वर्षातील वारीसोहळ्याचा आढावा घेतला. वारी सोहळा वाढवण्यासाठी पत्रकारांनी दिलेल्या योगदानाची माहिती दिली.
संतांची शिकवण सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची
भैय्यासाहेब पाटील म्हणाले, “आषाढी वारीची परंपरा मोठी आहे आणि पालखी सोहळा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पत्रकारांनी मोठे योगदान दिले आहे. संतांची शिकवण सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी भागवत धर्म प्रसारक हा पुरस्कार देवस्थानाच्या वतीने देण्यात येत आहे.”