संतपीठासाठी फर्निचर, बाकडे खरेदी करणार

0
504

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखलीतील मोरेवस्ती येथे उभारण्यात येणाऱ्या संतपीठातील कार्यालयासाठी फर्निचर आणि विद्यार्थ्यांसाठी बाकडे खरेदी करण्यात येणार आहेत. ही खरेदी तीन ठेकेदारांकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी 16 लाख रुपये खर्च होणार आहे.

चिखली येथे महापालिकेतर्फे संतपीठाची उभारणी करण्यात येत आहे. संतपीठाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या संतपीठामध्ये पाच इमारती असलेले शैक्षणिक संकुल उभारण्यात येत आहे. याठिकाणी कार्यालयासाठी फर्निचर आणि विद्यार्थ्यांसाठी बाकडे खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुक ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. 27 लाख 77 हजार रुपये निविदा दर ठरविण्यात आला.

त्यामध्ये तीन ठेकेदारांनी विविध साहित्यासाठी लघुत्तम दर सादर केले. त्यामध्ये सिद्धी कॉपीअर अॅण्ड स्टुडंट कन्झुमर स्टोअर यांनी दोन बाबींसाठी 4 लाख 50 हजार रुपये दर सादर केला. मुंबईतील अद्या प्रॉपर्टीज यांनी एका बाबीसाठी 1 लाख 49 हजार रुपये आणि चिंचवड येथील आरथ्रॉन टेक्नॉलॉजी यांनी एका बाबीसाठी 10 लाख 80 हजार रुपये दर सादर केला.

तीनही ठेकेदारांचा एकूण दर 16 लाख 79 हजार रुपये होत आहे. हा दर अंदाजपत्रकीय 27 लाख 77 हजार रुपयांपेक्षा 37.24 टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे तो स्वीकृत करण्यास महापालिका अतिरिक्त आयुक्त आणि मुख्य लेखापरीक्षक यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार या तीन ठेकेदारांसमवेत करारनामा करण्यात येणार आहे.