संडास साफ करणारा पोरगा कधीपासून बंदुक चालवायला लागला; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

0
90

मुंबई, दि. 24 (पीसीबी) : “पोलिसांच्या कमरेवरची बंदुक हिसकावणार. ती लॉक झालेली बंदुक फायर करणार हे कोणाला पटेल का? हे कोणाला पटू शकतं का? संडास साफ करणारा पोरगा कधीपासून बंदुक चालवायला लागला?” असा सवाल संजय राऊत यांनी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात उपस्थित केला आहे. बदलापूरच्या शाळेत चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे काल पोलीस एन्काऊटरमध्ये मारला गेला. “पोलीस, सरकार, फडणवीस, एकनाथ शिंदे हे आपटे, कोतवाल, आठवले यांना वाचवत आहेत. त्यासाठी मुख्य पुरावा नष्ट केला” असा आरोप संजय राऊत यांनी केला.

“हजारो बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरुन त्यादिवशी सरकारकडे एकच मागणी केली, आरोपीला आताच्या आता फाशी द्या, आम्ही न्याय देतो. मंत्र्यांना पिटाळून लावलं. अधिकाऱ्यांना येऊ दिलं नाही. जनता इतकी संतप्त होती, ही लोक भावना आहे” असं संजय राऊत म्हणाले. “दुसऱ्यादिवशी देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही. फास्ट ट्रॅकवर खटला चालवू असं एकनाथ शिंदे म्हणाले. माझा प्रश्न सरकारला आहे, दुसऱ्यादिवशी हजारो आंदोलकांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला? त्यांची मागणी न्याय होती, हे एन्काऊंटरमधून सिद्ध केलं. तुम्ही कोर्टात खटला चालवला नाही. मग तुम्ही शेकडो आंदोलकांनवर गुन्हे दाखल करुन धिंड काढली ते गुन्हे मागे घ्या” अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

“कोणाला तरी वाचवायचं आहे, ज्यांना वाचवायच आहे, त्यांच्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांचा वरदहस्त आहे. शाळेचं सीसीटीव्ही फुटेज का काढलं? साीसीटीव्ही फुटेज ज्याला मारलं त्याने काढलेलं नाही. शाळेच्या संस्था चालकाने ते फुटेज काढून टाकलं. ही शाळेची संस्था भाजपाशी संबंधित आहे. हे सगळे शिंदे, फडणवीसांशी संबंधित आहेत. म्हणून त्यांना वाचवण्यासाठी हे सर्व केलं” असं आरोप संजय राऊत यांनी केला.