संजोग वाघेरेंच्या विजयाचे फलक मावळात, पुण्यात महाआघाडीच्या फलकातून वाघेरे गायब

0
249

मावळ लोकसभा निवडणुकीतील मतदानानंतर दोन्ही उमेदवारांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी एक लाख ७२ हजारांनी विजयाचा दावा केला असून त्यांच्या विजयाचे फलक लागले आहेत. दरम्यान, पुणे शहरात महाआघाडीचे पुणे शहर आणि जिल्ह्यातील सभाव्य विजयी उमेदवार म्हणून बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून डॉ.अमोल कोल्हे आणि पुणे शहरातून रविंद्र धंगेकर यांचे भलेमोठे फलक लावण्यात आलेत. मावळचे महाआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा फोटो त्यात नसल्याने नाराजी पसरली आहे.

मावळमध्ये महायुतीचे खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात चुरशीची लढत झाली आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारणे आणि वाघेरे या दोघांकडूनही विजयाचे दावे केले जात आहेत. वाघेरे यांनी कर्जत, उरण, मावळ, पिंपरी, चिंचवड या पाच विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. एक लाख ७२ हजार मतांनी विजयी होईल, असा दावा केला आहे. तर, बारणे यांना केवळ पनवेलमधून आघाडी मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. निकालाला २० दिवस बाकी असतानाच संजोग वाघेरे यांच्या विजयाचे फलक लागले आहेत. मावळ विधानसभा क्षेत्रात येत असलेल्या देहूगाव आणि माळीनगर परिसरात संजोग वाघेरे यांच्या समर्थकांनी ‘खासदार’ असा उल्लेख असलेले फलक लावले आहेत. ‘खासदार आमच्या जनतेचा देहूनगरीत मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जीवावरती विजय निश्चित…घासून नाही ठासून हाणली… संजोग वाघेरे यांचे प्रचंड बहुमतांनी खासदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..’ असा मजकूर असलेले फलक लावण्यात आले आहेत.

दरम्यान, पुणे शहरातील फल्क विशेष चर्चेत आले आहेत. महायुतीचे उमेदवार सर्वश्री सुनेत्रा पवार (बारामती), शिवाजीराव आढळराव पाटील (शिरूर) आणि मुरलीधर मोहळ (पुणे) यांचा पराभव करून अनुक्रमे सुळे, कोल्हे आणि धंगेकर हे विजयी होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, महाआघाडीचे मावळ लोकसभा उमेदवार संजोग वाघेरे यांच्याबाबत शाश्वती नसल्याने त्यांचा फोटो फलकावर नसल्याची चर्चा सुरू आहे.