दि.४ (पीसीबी) – ठाकरेंच्या शिवसेनेला पिंपरी चिंचवड शहरात अक्षरशः घरघर लागली आहे. धडाडीच्या महिला कार्यकर्त्या सुलभा उबाळे आपल्या समर्थकांसह शिंदेंच्या शिवसेनेत गेल्या आणि आता त्यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे शहर प्रमुख संजोग वाघेरे हे सहकुटुंब अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश कऱणार आहेत. आज दुपारी दादांचे चिरंजीव पार्थ पवार हे वाघेरे यांच्या बंगल्यावर खास स्नेहभोजनासाठी उपस्थित होते. पितृपंधरवड्यानंतर वाघेरे हे आपल्या शेकडो समर्थकांसह स्वगृही राष्ट्रवादीत परतणार आहेत.
महानगर पालिकेच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. सत्तधारी पक्ष स्वबळावर निवडणुका लढणार की, एकत्र लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, भाजपसोबत अजितदादांची राष्ट्रवादी तसेच शिंदेंची शिवसेनासुध्दा स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारीत आहे. विशेष म्हणजे, प्रभाग रचना जाहीर झाल्यापासून सर्व राजकीय पक्षांत हालचाली वाढल्या आहेत.
पुण्यात अजित पवार हे प्रभाग रचना अंतिम होण्यापूर्वी राज्य पातळीवरून चक्रे फिरविण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच, पार्थ पवार यांचा पिंपरीतील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ते ठाकरे गटाचे बडे नेते माजी महापौर आणि शिवसेनेचे शहर प्रमुख संजोग वाघेरे यांच्या घरी जेवणासाठी पार्थ पवार यांनी उपस्थिती लावल्याचे पाहायला मिळाले. संजोग वाघेरे, उषा वाघेरे यांनी पार्थ पवार यांचे आगतस्वागत केले. माजी उपमहापौर डब्बू आसवाणी, नाना काटे यावेळी उपस्थित होते.
वाघेरे यांच्या गणेश मंडळात पार्थ पवार यांनी आरती केली. त्यावेळी काँग्रेसच्या माजी नगरसेविका गिरीजा कुदळे यांनी भक्तीशक्ती शिल्प देऊन पार्थ पवार यांचा सन्मान केला. राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष नाना काटे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, प्रवक्ते फजल शेख, ऋषिकेश वाघेरे, बजरंग दलाचे शहराध्यक्ष कुणाल साठे आदी उपस्थिती होते.पार्थ पवार थेट ठाकरे गटाच्या शहराध्यक्षांच्या घरी जेवणासाठी गेले असता शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या निमित्ताने पार्थ पवार यांच्याकडून शहरातील विविध मंडळांना भेटी देत मोर्चे बांधणी सुरु आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या निवासस्थानी त्यांनी भोजन केले.
आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी पार्थ पवार यांनी मोर्चे बांधणी सुरू केल्याची जोरदार चर्चा असून त्याचाच भाग म्हणून वाघेरे यांच्या घरी भोजन करत त्यांना आपल्याकडे खेचण्याची खेळी पार्थ पवार करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
पदाधिकाऱ्यांकडून स्वबळाचा लढण्याचा आग्रह
राष्ट्रवादी’च्या पदाधिकाऱ्यांचा स्वबळावर निवडणुका लढविण्याचा आग्रह धरला आहे. युती झाल्यास हक्काच्या प्रभागांमध्ये मित्रपक्षांना जागा द्याव्या लागतील, या शक्यतेने पदाधिकारी हे स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी अजित पवार यांच्याकडे आग्रह धरत आहेत. मात्र, अजित पवारांनी सावध भूमिका घेतली आहे. महायुतीतील मित्रपक्षांशी चर्चा झाल्यानंतर निर्णय जाहीर होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.