दि.३१(पीसीबी)-राज्यातील महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे खासदार संजय राऊत यांना गंभीर आजार झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संजय राऊत यांनी पुढील दोन महिने सार्वजनिक जीवनापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. ते आता थेट नवीन वर्षात सार्वजनिक जीवनात पुनरागमन करतील. मात्र, मुंबई महानगरपालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिले असताना शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत यांनी राजकारणापासून ब्रेक घेणे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
संजय राऊत यांनी काहीवेळापूर्वीच आपल्या ट्विटर हँडलवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. यामध्ये संजय राऊत यांनी प्रकृतीची गंभीर समस्या उद्भवल्याचे नमूद केले आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तत्पूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी झाली होती. त्यावेळी संजय राऊत यांच्या प्रकृतीत इतका गंभीर बिघाड होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र, अखेर आज त्यांनी पत्रक प्रसिद्ध करुन आपल्या आजाराबद्दल माहिती दिली. संजय राऊत हे दररोज सकाळी पत्रकार परिषद घेत असत. मात्र, आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषदही घेतली नव्हती. त्यानंतर काहीवेळातच संजय राऊत यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबद्दलची माहिती समोर आली.
संजय राऊतांच्या पत्रात नेमकं काय म्हटलंय?
सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यासाठी नम्र विनंती
जय महाराष्ट्र !
आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या.
कळावे.
ठाकरे गटासाठी एकहाती खिंड लढवणारे संजय राऊत यांचा राजकारणातून ब्रेक
संजय राऊत हे शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जातात. 2019 साली उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केल्यापासून संजय राऊत हे सातत्याने प्रभावीपणे ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. ठाकरे गटाचा अजेंडा प्रभावीपणे मांडण्यात आणि विरोधकांवर आगपाखड करण्याचे काम संजय राऊत एकहाती करत असतात. संजय राऊत यांनी गेल्या काही वर्षांमध्ये ठाकरे गटासाठी अक्षरश: एकहाती खिंड लढवली आहे. दररोज सकाळी नियमाने पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडतात. राऊतांच्या या टीकेचा प्रतिवाद करण्यासाठी महायुतीने आापर्यंत अनेक नेत्यांची फौज तैनात केली होती. मात्र, संजय राऊत या सर्व नेत्यांना पुरुन उरत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
 
             
		












































