संजय राऊत यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी

0
337

मुंबई, दि. ८ (पीसीबी) : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून त्यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत शिवडी न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मुंबई महानगर दंडाधिकारीनी राऊत यांच्याविरुद्ध हे जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.

संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर शंभर कोटींच्या शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. हा आरोप एका महिलेवर दबाव टाकण्यासाठी आहे. त्यांच्याकडे याचा एकही पुरावा नाही, असा दावा सोमय्या यांनी केला होता. यांविरोधात मेधा सोमय्या यांनी १८ मे रोजी पोलिसांत धाव घेतली होती. कोणताही पुरावा नसताना राऊतांकडून बदनामीकारक वक्तव्य केली जात असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने त्यांनी शिवडी न्यायालयात धाव घेतली होती.

मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्याविरोधातील तक्रार अर्ज मुंलुंडमधील नवघर पोलीस ठाण्यात दिला आहे. राऊतांवर त्यांनी धमकावण्याचे आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात आयपीसी कलम 503, 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी अर्जात करण्यात आली होती. राऊत यांनी माध्यमांमध्ये दुर्भाग्यपूर्ण आणि अयोग्य भाष्य केले आहे. त्यांनी केवळ आपले चारित्र्यहनन केले नाही तर मला घाबरवले आणि धमकावलेही आहे, असे तक्रार अर्ज म्हटले होते.

याआधी मेधा सोमय्या यांनी राऊतांना मानहानीची नोटीस पाठवली होती. राऊतांनी 48 तासांत माफी मागितली नाही, तर कायदेशीर कारवाई करू, असे नोटीसीमध्ये म्हटले होते. त्यानंतर आता पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर त्यांनी न्यायालयातही दावा दाखल केला होता. .

दरम्यान, संजय राऊत यांनी सोमय्या कुटुंबावर अनेक आरोप केले आहेत. त्याचे पुरावे त्यांनी द्यावे, अन्यथा माफी मागणी, असे मेधा सोमय्या यांनी पाठवलेल्या नोटीसीमध्ये म्हटले होते. त्याच बरोबर राऊत यांनी केलेला 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप बदनामीकारक असून ते पूर्णपणे खोटे आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे.