संजय राऊत यांच्याकडे पुणे परगना दिल्याने काय साधणार ? – थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
512

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे शिवसेना आता कुठे अॅक्शन मोडवर आली. राज्यातील संघटनात्मक बांधणीची विभागवार जबाबदारी त्यांनी आपल्या दहा नेत्यांवर सोपविली. शरद पवार-अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर, मावळ या चारही लोकसभा आणि पिंपरी-चिंचवड, भोसरी आणि मावळ विधानभा मतदारसंघाची जबाबदारी शिवसेना नेते आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांना देण्यात आली. खरे तर गेल्या पाच वर्षांत सत्तांतराच्या एकूणच घडामोडीत संजय राऊत हेच केंद्रस्थानी आहेत. प्रसंग कोणताही असो त्यांची मुलखमैदान तोफ अखंडपण रोज धाडडते. माध्यमांचे अर्धेअधिक कव्हरेज तेच खाऊन जातात. सामनाचा अग्रलेख, रोखठोक, सच्चाई असे वा ठाकरेंच्या मॅरेथॉन मुलाखती तो सर्वांसाठी मथळा असतो. आजही रोज पहिल्या पानाची बातमी तेच देतात. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता राऊतांची दुधारी तलवार फिरते आणि अनेकांना जायबंदी करते. भाजपने शिवसेना फोडली, १४ खासदार, ५० आमदार फोडले. अशा पडक्या काळात राऊत हे शिवसेनेचे वकिल बनून बरसत राहिले. आता त्याच राऊत यांच्याकडे पुणे, पिंपरी चिंचवड सोपविण्यात आले. जिथे गेल्या तीस वर्षांत राजकारणात अजित पवार हेच सर्वेसर्वा आहेत आणि त्यांचाच शब्द प्रमाण समजला जातो त्या परगण्याची सुभेदारी राऊतांकडे सोपविण्यात आली. आता तर दादांच्या दिमतीला शिंदे-फडणवीस आहेत. गावचा सरपंच असो वा दुध संघाचा चेरमन असो. बहुतांश सर्वच साखर कारखान्यांचे सूत्र संचलन दादांचीच माणसे करतात. जिल्हा बँक, कार्यकारी सोसायट्यांपासून अगदी शाळा महाविद्यालयांपर्यंतच्या ९० टक्के संस्था संघटनांचे पालक अजितदादा आहेत. खासदार सुप्रिया सुळे सोडल्या तर श्रीरंग बारणे शिंदे गटाचे आणि अमोल कोल्हे हेसुध्दा दादांकडे झुकलेत. आज अगदी दिलीप वळसेंसह ८० टक्के आमदार महायुतीच्या छत्राखाली आहेत. जिल्हा परिषदेला दादा सांगतील तो अध्यक्ष होतो. कात्रज दूध संघ, जिल्हा बॅंक दादांच्याच ताब्यात. फाटाफुटीनंतरही ७० टक्के कार्यकर्त्यांचा कल दादांकडे. बरे, दहा वर्षांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडे दोन खसादार, पाच आमदार होते आता तसा सुपडा साफ आहे. थोडक्यात आज जिल्ह्यातील शिवसेनेची अवस्था अगदी ओसाड गावच्या पाटलासारखी आहे. अशा बिकट परिस्थितीत इथे संघटना पुन्हा नव्या दमाने उभी करायची तर घाम गाळावा लागेल, संजय राऊतांची खरी कसोटी लागणार आहे. एक निश्चित, दोन्ही शहरे आणि जिल्ह्याच्या राजकारणात आज मितीला एक निर्वात पोकळी आहे. आजही बाळासाहेबांचे जुने हाडामासाचे शिवसैनिक संधीची वाट पाहून आहेत. अनेक उपऱ्यांनी इथे शिवसेना हायजॅक केली, पूरेपूर वापरली आणि काम संपताच सोडून दिली. ज्यांनी लोकांच्या प्रश्नासाठी लाठ्याकाठ्या खाल्ल्या, ज्यांच्यावर आजही अनेक आंदोलनांचे खटले आहेत असे हजारो सैनिक आहेत. भाजपने शिवसेनेची शिडी केली आणि बस्तान बसताच साथ सोडली हे लोकांनाही आवडलेले नाही. शिवसेनेतील फाटाफूट, मोदी-शाहांच्या तालावरचे फडणवीसांचे राजकारण, भाजपची सत्ता लालसा आणि आयटी, सीबीआय, ईडी (ICE) ला घाबरून बळी पडलेले शिंदे-पवार हे सामान्य जनतेला पचलेले नाही. होय, त्यामुळे शिवसेनेला मोठी सहानुभुती आहे, ती एनकॅश करता आली पाहिजे. पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच जिल्ह्यात शिवसेनेला खूप मशागत करावी लागेल. घरात बसलेल्या जुन्या शिवसैनिकांच्या पाठीवर हात फिरवा, त्यांना साद घाला. जीवाला जीव देणारे अजूनही आहेत. भाजपच्या वळचणीला गेलेले अनेक नेते पुन्हा संघटनेत येऊ शकतात. फक्त त्यांना ताकद हवी संरक्षण हवे आणि १०१ टक्का लढण्याची खात्री पाहिजे. कडव्या शिवसैनिकांनी पवारांच्या राजवटीत रट्टे खाल्लेत, त्यामुळे त्यांचे प्रचंड वावडे आहे. आता हे मेतकुट जमवायचे तर राऊतांनाच पुढाकार घ्यावा लागेल. होय, सर्वप्रथम संघटनेतील विकाऊ, बाजारू आणि निव्वळ बोलघेवड्यांना बदलण्याची नितांत गरज आहे. आज पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका या भ्रष्टाचाराचे कुरण होऊन बसल्यात. भाजप काळातील भ्रष्टाचार १०० रुपये होता, तर आता प्रशासन काळात तो २०० रुपये आहे. शेकडो प्रकरणे आहेत, पण शिवसेनेचे जबाबदार पदाधिकारी तोंडाला कुलूप घालून बसलेत. स्मार्ट सिटी प्रकल्पात दोन्ही महापालिकांची प्रचंड लूट झाली. शिवसेनेच्या नेत्यांनी पत्र देऊन सरळ मांडवली केली आणि कायमचे तोंड बंद केले. प्रशासनाने गेल्या २० महिन्यांत हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला. प्रभागांतून फक्त कागदोपत्री कामे दाखवून करदात्यांच्या पैशावर १००-१०० कोटींचा दरोडा घातला. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी पालिकेच्या जागांचे सौदे केले आणि हितसंबंधीत बिल्डरच्या घशात भूखंड घातले. पीएमआरडीए मध्ये अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली कोटी कोटींची खंडणी वसुली झाली. दोन्ही शहरांत किमान पाच-दहा हजार कोटींच्या टीडीआर घोटाळ्यांची प्रकरणे उघडकिस आलीत. दुर्दैवाने शिवसेनेचे नेते डोळ्यावर पट्टी ओढून बसलेत. अवैध बांधकामे नियमीत होऊ शकलेली नाहीत. अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. रेल्वे, लष्कर, प्राधिकऱण, देवस्थान, गायरान, महारवतनाच्या जागा हडपण्याचा मोठा उद्योग या पुणे प्रांतात तेजीत आहे. रिअल इस्टेटमध्ये मुंबईच्या खालोखाल आज पुणे आहे. तमाम राजकीय मंडळी बिल्डरचे मांडलिक झालेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललाय. मुळा-मुठा, पवना-इंद्रायणी या नद्यांच्या प्रदुषणाने कळस गाठलाय. हवा प्रदुषणात दोन्ही शहरे मुंबईच्या पुढे आहेत. अशा शेकडो प्रश्नांची जंत्री मारुतीच्या शेपटीसारखी लांबत जाईल. शिवसेनेला पहिल्या सारखे मैदान मारायचे तर या प्रश्नांवर रान पाटवावे लागेल. प्रस्थापित किंवा गद्दार खासदार-आमदारांच्या विरोधातसुध्दा वाट्टेल तितके मुद्दे आहेत. फक्त पेपरबाजी किंवा तोंड चालवून होणार नाही. राऊतांचा दानपट्टा फिरला पाहिजे. पुणे शहर जिल्ह्यासाठी सचिन आहिर यांच्या बरोबरीने स्थानिकांमधून एखादा संपर्क नेता नियुक्त केला पाहिजे. उंटावरून शेळ्या हाकून शिवसेना मोठी होणार नाही. खरे तर, पूर्वीच्या काळी शशिकांत सुतार, काका वडके, नंदू घाटे, गजानन बाबर, दीपक पायगुडे, नाना बलकवडे असे साहेबांचे जीवश्चकंठश्च शिवसैनिक होते. आता तो सगळा इतिहास झाला. नव्या दमाचे, आधुनिक विचारांचे अभ्यासू नेते शोधून त्यांच्याकडे संघटनेची जबाबदारी सोपविली पाहिजे. आज संजय राऊत यांच्या आजुबाजुलाच असे किमान २५-३० लोक आहेत. मनात आणले तर ते भाजपचे आणि अजितदादांचेही बारा वाजवू शकतात. फक्त त्यांना मातोश्रीचा आशिर्वाद पाहिजे आणि राऊतांचे मार्गदर्शन. मावळ आणि शिरुर लोकसभा पुन्हा घेणे शक्य आहे. पिंपरी राखीवसह पुणे शहर जिल्ह्यातील किमान ५-६ आमदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मदतीने निवडूण आणायची ताकद आहे. शिंदे-फडणवीस यांना त्राही भगवान करून सोडणारे आणि राज्याचे राजकारण ढवळून काढणारे संजय राऊत ते करू शकतात.