संजय राऊत यांची कोठडी १० ऑक्टोबर पर्यंत

0
300

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या जामीनावर पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला होणार आहे. आज संजय राऊत यांच्याकडील बाजू ऐकून घेण्यात आली आहे. तर पुढील तारखेला ईडी आपली बाजू मांडणार आहे. स्पेशल पीएमएलए कोर्टमध्ये ही सुनावणी सुरू आहे. संजय राऊत यांच्या कोठडीत आणखी 13 दिवसांनी वाढ झाली आहे.

काय आहे पत्राचाळ घोटाळा प्रकरण ? –
गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रविण राऊत यांची मे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली होती. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रविण राऊत यांचं या कामासाठी म्हाडासोबत कंत्राट झालं होतं. म्हाडा भाडेकरूंना घरे न बांधताच प्रविण राऊत यांच्या कंपनीने ९ विकास कामांना ९०१ कोटींना एफएसआय विकला आणि मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू केला. त्याच्या नावाखाली या कंपनीने १३८ कोटी रूपये जमा केले होते. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरने तक्रार केल्यानंतर या कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.

या चौकशीत १०३९.७९ कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचं चौकशीत उघड झालं. त्यामधील १०० कोटी रूपये प्रविण राऊत यांच्या अकाऊंटवर जमा झाल्याचं समोर आलं आहे. ही रक्कम प्रविण राऊत यांनी जवळच्या नातेवाईकांच्या खात्यावर ट्रान्सफर केली होती. त्यातील ५५ लाख रूपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर जमा झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं आहे आणि याची ईडीकडून चौकशी सुरू आहे.