संजय राऊत यांचा गणेशोत्सव जेलमध्येच

0
272

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडीची मुदत संपत असल्याने संजय राऊत यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने त्यांच्या १९ सप्टेंबरपर्यंत वाढ केली.

गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. या घोटाळय़ाप्रकरणी ४ ऑगस्ट रोजी न्यायालयात सुनावणी झाली होती. त्या वेळी त्यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. ही मुदत संपुष्टात आल्यानंतर न्यायालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) २००२ नुसार राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर संजय राऊत यांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली होती. यानंतर न्यायालयीन कोठडीच ५ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती.