संजय राऊत एकाकी, खासदारांचा पाठिंबा द्रोपदी मुर्मू यांनाच

0
210

– शिवसेनेच्या भूमिकेबाबत आता उध्दव ठाकरे यांची मोठी कोंडी

मुंबई, दि. ११ (पीसीबी) : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली खासदारांची बैठक झाली. या बैठकीमध्ये १४ खासदार उपस्थित होते. या खासदारांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. या बैठकीमध्ये सर्व खासदार विरुद्ध संजय राऊत असा सामना रंगला. खासदारांच्या मागणीला राऊत यांनी विरोध केल्याची माहिती मिळत आहे.बैठकीमध्ये संजय राऊत वगळता उर्वरित खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्याची भूमिका मांडली. या बैठकीनंतर राऊत हे माध्यमांशी संवाद न साधता मातोश्रीवरून रवाना झाले. राऊत अन्य खासदारांच्या भूमिकेवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार गजानन किर्तीकर म्हणाले, बैठकीला 18 पैकी 4 खासदार गैरहजर होते. सगळ्या खासदारांनी भाजप उमेदवार आदिवासी असल्याने त्यांना मतदान करावे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. उद्धव ठाकरे उद्या आपली भूमिका जाहीर करणार आहेत. कोणताही वेगळा गट तयार केला जाणार नाही, असेही किर्तीकर यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे गटात कोण जाणार यावर चर्चा झाली नाही, असेही किर्तीकर यांनी सांगितले. यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की द्रौपदी मुर्मु यांना मतदान केले तर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाराज होईल यावर काही चर्चा झाली का? त्यावर किर्तीकर यांनी सांगितले यावर कोणतीही चर्चा झाली नाही.दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ४० आमदार त्यांच्यासोबत गेले आहेत. तर आता उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये ४ खासदार अनुपस्थित राहिले. उपस्थित असलेल्या १४ खासदारांनी भाजप सोबत जाण्यासंदर्भात भूमिका मांडली. त्यामुळे आता ठाकरेंसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

१० खासदार ‘मातोश्री’वर उपस्थितांमध्ये संजय राऊत, गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत, विनायक राऊत,
हेमंत गोडसे, प्रियांका चतुर्वेदी, धैर्यशील माने, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, अनिल देसाई यांचा समावेश आहे.