दि.२८(पीसीबी) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील सत्र न्यायालयाने भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी प्रा. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात राऊत यांची निर्दोष मुक्तता केली. सत्र न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा दोषी ठरवण्याचा निर्णय रद्द करत राऊत यांचे अपील मंजूर केले.
या प्रकरणात २६ सप्टेंबर २०२४ रोजी दंडाधिकारी न्यायालयाने राऊत यांना दोषी ठरवत १५ दिवसांची साधी कैदेची शिक्षा सुनावली होती. तसेच त्या शिक्षेला ३० दिवसांची स्थगिती देत त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर राऊत यांनी अॅडव्होकेट मनोज पिंगळे यांच्यामार्फत सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते.
मेधा सोमय्या यांनी आपल्या तक्रारीत आरोप केला होता की, राऊत यांनी १५ एप्रिल २०२२ रोजी आणि त्यानंतर माध्यमांद्वारे त्यांच्या विरोधात विनाकारण व दूषित हेतूने विधानं केली, ज्यामुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली. दंडाधिकारी न्यायालयानेही निरीक्षण नोंदवत म्हटले होते की, राऊत यांनी संबंधित व्यक्तीची बदनामी होऊ शकते हे माहित असूनही आवश्यक खबरदारी घेतली नाही.
दरम्यान, अपीलमध्ये राऊत यांनी दावा केला की त्यांनी कोणताही वैयक्तिक द्वेष ठेवलेला नव्हता आणि त्यांनी केलेली विधानं ही आमदार प्रताप सरनाईक व नगरसेवक प्रवीण पाटील यांनी दिलेल्या पत्रांवर आधारित होती. तसेच गैरप्रकारांबाबत बातमी प्रसिद्ध करणे हा पत्रकार म्हणून आपला अधिकार असल्याचे त्यांनी नमूद केले होते.
सत्र न्यायालयाने सर्व बाजूंचा विचार करून खालच्या न्यायालयाचा निर्णय कायद्याच्या निकषांवर टिकत नसल्याचे नमूद करत तो रद्द केला आणि राऊत यांना निर्दोष मुक्त केले. दरम्यान, मेधा सोमय्या यांच्या वकिलांनी या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याचा इरादा व्यक्त केला आहे.या निकालामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून पुढील कायदेशीर घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.










































