संजय राऊतांच्या घरी EDची टीम पोहोचली

0
421

मुंबई दि. ३१ (पीसीबी): खासदार संजय राऊतांच्या घरी ED ची टीम पोहोचली आहे. पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांना पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्यानं ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचलं असल्याचं बोललं जात आहे. आता संजय राऊत यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, संजय राऊत यांची लूटमार, माफियागिरीचे मी पुरावे दिले होते. महाविकास आघाडी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. राज्यातील जनतेची लूट करणाऱ्या संजय राऊतांचा आज हिशोब होणार आहे. संजय राऊतांविरोधात मी पुरावे दिले आहेत. मला विश्वास आहे की, संजय राऊतांना नवाब मलिकांच्या शेजारी राहायला जावं लागणार आहे. आता कारवाई सुरु आहे. संजय राऊतांची धावपळ सुरु होती, आता त्यांना हिशोब द्यायला जावंच लागणार आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले.

नेमकं काय पत्राचाळ प्रकरण…
पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे, असा आरोप करण्यात आला आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे.

प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.

संजय राऊतांना ईडीनं का पाठवलं समन्स?

ईडीनं 1 फेब्रुवारी रोजी ECIR दाखल केली होती. त्यानंतर प्रवीण राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याशी संबंधित मालमत्तांवर एकूण 7 ठिकाणांवर छापेमारी केली होती. त्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती.