संतोष बांगर यांची पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ? ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया

0
314

मुंबई ,दि.०४ (पीसीबी)- शिंदे गटातील आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादात अडकले असून मंत्रालयाच्या गेटवर पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. आपल्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना अडवल्याने संतोष बांगर यांनी पोलीस कर्मचाऱ्याला जाब विचारत शिवीगाळ केल्याचं सांगितलं जात आहे. संतोष बांगर यांनी मात्र आरोप फेटाळले असून, सीसीटीव्ही फूटेज तपासून पाहा असं सांगितलं आहे. दरम्यान, यावर ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

२७ ऑक्टोबरला ही घटना घडल्याची माहिती आहे.संतोष बांगर आपल्या १५ कार्यकर्त्यांसोबत मंत्रालयात जात असताना गेटवर कॉन्स्टेबलने त्यांना अडवलं. पोलीस कर्मचाऱ्याने कार्यकर्त्यांचा पास काढण्यास सांगितल्याने संतोष बांगर संतापले. त्यांनी त्या कर्मचाऱ्यासोबत वाद घातला आणि आपल्याला ओळखत नाही का? अशी विचारणा केली. पोलीस कॉन्स्टेबलने यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. संतोष बांगर यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

“मी कोणत्याही प्रकारे पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली नाही. मी काही कार्यकर्त्यांसोबत मंत्रालयात जात असताना तेथील पोलीस कर्मचाऱ्याने डायरीत प्रवेशाची नोंद करण्यास सांगितलं. यावेळी एका कार्यकर्त्याने सोबत आमदार असल्याचं सांगितलं. त्या कर्मचाऱ्याने मला ओळखलं नव्हतं. पण ओळखल्यानंतर सन्मानाने मला आत पाठवलं. माझ्या पीएने नंतर डायरीत नोंद केली. आम्ही कोणतीही हुज्जत घातली नाही,” असा दावा संतोष बांगर यांनी केला आहे. “हुज्जत घातली असेल तर सीसीटीव्ही कॅमेरे तपासा,” असंही ते म्हणाले.
“मी कशासाठी पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालेन. तो बिचारा कर्मचारी सकाळपासून तिथे काम करत असतो. कर्तव्य बजावणाऱ्या त्या कर्मचाऱ्याशी मी हुज्जत घातली नाही,” असा बांगर यांचा दावा आहे.

“संतोष बांगर आणि वाद हे एकत्र नांदणारे आहेत. मुख्यमंत्र्यांनी समज देऊनही ते ऐकत नाहीत,” अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. दरम्यान मला मुख्यमंत्र्यांनी कोणतीही समज दिलेली नसून, त्या सर्व बातम्या चुकीच्या होत्या असं प्रत्युत्तर बांगर यांनी दिलं.
“छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांनी मला अन्यायाविरोधातील लढा देण्याची शिकवण दिली आहे. ते काम मी करत आहे. पण पोलीस कर्मचाऱ्याशी कोणताही वाद घातलेला नाही,” असं बांगर म्हणाले.