संघ आणि भाजपमधील ताणलेल्या संबंधांची चर्चा सुरु, संघाचे अतुल लिमये महाराष्ट्रातील समन्वयक

0
51

मुंबई, दि. १३ : लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाल्ल्यानंतर आता भारतीय जनता पक्षानं विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. लोकसभेवेळी प्रचारापासून काहीसा लांब राहिलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता सक्रिय झाला आहे. लोकसभा निवडणुकीत संघ निष्क्रिय राहिल्याचा फटका भाजपला बसला आहे. यानंतर संघ आणि भाजपमधील ताणलेल्या संबंधांची चर्चा सुरु झाली. यानंतर आता विधानसभेसाठी संघानं कंबर कसली आहे.

महाराष्ट्र, झारखंड, हरयाणा, जम्मू-काश्मीरमध्ये पुढील दोन ते तीन महिन्यांत निवडणुका होत आहेत. त्यासाठी होत असलेल्या बैठकांमध्ये संघाचे वरिष्ठ नेतृत्त्व सक्रिय सहभाग घेत आहे. संघाचे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमये महाराष्ट्रातील भाजपशी समन्वय साधतील. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपचं पानीपत झालं. त्या पार्श्वभूमीवर लिमये यांच्याकडे संघानं महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

अतुल लिमये नेमके कोण?
संघानं ५० वर्षांच्या अतुल लिमये यांच्याकडे सह सरकार्यवाह पदाची जबाबदारी दिली आहे. या पदावर संघानं पहिल्यांदाच इतक्या कमी वयाच्या व्यक्तीची नेमणूक केली आहे. सरसंघचालक मोहन भागवत, महासचिव दत्तात्रय होसबळे यांच्यानंतर संघात सह सरकार्यवाह पद तिसऱ्या क्रमांकावर येतं. होसबळे यांनी २०२१ मध्ये पदभार हाती घेतला. तेव्हापासून ते याच पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याशिवाय मनमोहन वैद्य सह सरकार्यवाह पदावर होते. त्यांना संघानं राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान देण्यात आलं आहे.

अतुल लिमये मूळचे महाराष्ट्रातलेच आहेत. पश्चिम विभागात त्यांनी क्षेत्र प्रचारक म्हणून काम केलं आहे. त्यांनी महाराष्ट्रात संघाच्या विस्तारात योगदान दिलं आहे. याशिवाय गुजरात, नागपूरसह गोव्यातही संघासाठी काम केलं आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये त्यांनी अनेक वर्षे घालवली आहेत. त्यांना मार्चमध्ये सह सरकार्यवाह पद देण्यात आलं.