- आपली सुरूवातदेखील संघाच्या शाखेतूनच – एकनाथ शिंदे
नागपूर, दि. १९ – विधानसभेच्या नागपूर अधिवेशनानिमित्त प्रथेप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महायुतीच्या आमदारांना गुरुवार (१९ डिसेंबरला) सकाळी ८ वाजता संघ कार्यालयात निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र या कार्यक्रमाला गैरहजर राहिले. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले. याबरोबरच आपली सुरूवातदेखील संघाच्या शाखेतूनच झाल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “रेशीम बाग येथे मी पहिल्यांदा आलेलो नाही. यापूर्वी देखील आलो आहे. संघ आणि संघ परिवार यांच्याशी माझं नातं लहानपणापासूनचं आहे. संघाच्या शाखेतूनच माझी सुरूवात झाली. नंतर शिवसेनेच्या शाखा आणि शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि आनंद दिघे यांची शिकवण हे सुरू झालं”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
“संघ परिवार आणि शिवसेना यांचे विचार एकसारखे आहेत. निरपेक्ष भावनेने कसे काम करावे हे संघाच्या संघ परिवाराकडून शिकावं. कोणत्याही प्रसिद्धिची अपेक्षा न ठेवता संघाचा स्वयंसेवक काम करतो. देशभरात संघाच्या ५ लाख शाखा आहेत. १९२५ रोजी संघाची स्थापना डॉ. हेडगेवार यांनी केली. पुढच्या वर्षी त्याला १०० वर्ष पूर्ण होत आहेत हे देखील विशेष आहे”, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, “देशाच्या सेवेत संघाचे योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. संघाची शिकवण जोडणारी आहे, तोडणारी नाही”.
फडणवीस मुख्यमंत्री झाल्याचा आनंद – शिंदे
महायुती सरकारला मिळालेल्या प्रचंड बहुमतानंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस बसले याचा आनंद असल्याचेही शिंदे म्हणाले. त्यांनी सांगितलं की, “देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. मला आनंद आहे की ते देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. ते राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री झाले याचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे, त्यांच्या सहकाऱ्याला आहे”.
इथे (रेशीम बागेत) आल्यानंतर प्रेरणा, ऊर्जा मिळते आणि पुढील काम करण्यासाठी बळ मिळतं. निरपेक्ष भावनेने समाजसेवा करणाऱ्यांनी जरूर एकदा तरी यावे आणि इथून प्रेरणा घेऊन जावी, असेही शिंदे यावे म्हणाले.
भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाचे आमदार रेशीमबागेतील स्मृतिमंदिर स्थळी जाऊन आद्या सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतात. त्यामुळे अजित पवार या बौद्धिक वर्गाला उपस्थित राहाणार का याबद्दल उत्सुकता लागून राहिली होती. यापूर्वी महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर २०२३ मध्ये नागपुरात झालेल्या अधिवेशनादरम्यान संघाकडून परिचय वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अजित पवार यांनी दोनदा संघ मुख्यालयात जाणे जाणे टाळले होते. यंदाही अजित पवार गटाचे केवळ राजू कारेमोरे वगळता अन्य कोणीही आमदार या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत.