संघाचे सरकार्यवाहक भय्याजी जोशींच्या वक्तव्यावर ठाकरेंचा हल्लाबोल

0
4

दि . 6 ( पीसीबी ) – मुंबईला एक भाषा नाही. त्यामुळे मुंबई सोपी आहे. इथे येणाऱ्याने मराठी शिकलेच पाहिजे असे काही नाही, असे धक्कादायक विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरुन विधानसभेत चांगलाच गदारोळ माजला. यावेळी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत जोशींवर हल्लाबोल केला. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भय्याजी जोशींचं वक्तव्यावर त्यांच मत स्पष्ट केलं.

मुबई उपनगरातील विद्याविहार परिसरातील कार्यक्रमात भय्याजी जोशी यांनी केलेलं वक्तव्य आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानसभेत मांडण्यात आलं. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करत सुरु झालेल्या वादाला पुर्णविराम दिला. मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे. असं म्हणत भय्याजी जोशी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत केली. तर आमदार भास्कर जाधव यांनी यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न उपस्थित केले.

जोशींच्या वक्तव्यावरुन विधानसभेच गदारोळ
विधानसभेत बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री फडणवीस यांना सवाल उपस्थित केले. प्रत्येक कामकाज मराठीमध्ये चालल पाहिजे असं तुम्ही म्हणता. पण जोशींनी केलेल्या वक्तव्य अन् मराठी भाषेच अपमान करणं यावर आपली भूमिका काय? अशी विचारणा त्यांनी यावेळी केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीनं उठत जोशींनी केलेल्या वक्तव्यावर स्पष्ट भूमिका मांडली.

काय म्हणाले फडणवीस?
सरकारची भूमिका पक्की आहे. राज्यात राहणाऱ्या प्रत्येकानं मराठी शिकलं पाहिजे. मराठी आलं पाहिजे आणि या माझ्या या वक्तव्यावर जोशी यांचे दुमत असेल मला वाटत नाही. इतर भाषांचा इथे सन्मान आहे, कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही. जो स्वत:च्या भाषेवर प्रेम करतो तोच इतरांच्या भाषेवर प्रेम करु शकतो, पण शासनाची भूमिका पक्की आहे. असं पुन्हा वक्तव्य फडणवीस यांनी केलं.

आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
भय्याजी जोशी यांचं कालचं वक्तव्य प्रत्येक मराठी माणसाने ऐकावे. त्यांनी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा अपमान केला आहे. राज्य सरकारने मरीन ड्राईव्हवरील मराठी भवन आणि गिरगावमधील दालन देखील रद्द केलंय. निवडणुकांनंतर अभिजात भाषेचा दर्जा दिला असं सांगितलं. मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे. भय्याजी जोशी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

भय्याजी जोशी नेमकं काय म्हणाले होते?
मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत काम करणारा प्रत्येकजण ईश्वरी कार्य करत आहे. स्वयंसेवक नावाची ही शक्ती आहे, त्या शक्तीच्या रूपाने प्रत्येकजण काम करतो. जे स्वतःसाठी जगतात ते पशु समान असतात आणि दुसऱ्यासाठी जगतात ते खरे आयुष्य जगतात आणि त्यांनाच मनुष्य म्हणावे, असे भय्याजी जोशी यांनी म्हटले होते.