संगीत अकादमीच्या वर्धापनदिनानिमित्र शास्त्रीय गायन, सुगम संगीत, हार्मोनियम, तबला वादनाचे सेमिनार

0
332

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संगीत अकादमीचा 21 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात येत आहे. शास्त्रीय गायन, सुगम संगीत, हार्मोनियम वादन तसेच तबला वादनाचे सेमिनार आयोजित करण्यात आले आहेत.  सुप्रसिद्ध गायक विराज जोशी यांच्या शास्त्रीय गायनाने वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचा उपस्थितांनी निखळ आणि सात्विक आनंद घेतला.

महापालिकेच्या क्रीडा विभागांतर्गत संगीत अकादमीच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त निगडी येथील संत तुकाराम महाराज व्यापार संकुल येथे महापालिकेच्या संगीत अकादमीमध्ये तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले आहे. पहिल्या दिवशीच्या  कार्यक्रमात भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी यांचे नातू गायक विराज जोशी यांच्या  शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांना तबला साथ संतोष साळवे, हार्मोनियम साथ उमेश पुरोहित तर तानपुरा साथ नीलिमा बोरकर यांनी दिली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर सूर्यवंशी यांनी केले.

या कार्यक्रमास क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, क्रीडाधिकारी अनिता केदारी, माजी क्रीडा पर्यवेक्षक अशोक पटेकर यांच्यासह संगीत विषयक शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये दोन  दिवस संगीत सेमिनारचे  आयोजन करण्यात आले आहे.   यामध्ये तबलावादन, सुगम संगीताचे सेमिनारचा समावेश आहे.

शहरात संगीत क्षेत्रात दर्जेदार कलाकार निर्माण व्हावेत या उद्देशाने महापालिकेने संगीत अकादमीची स्थापना केली.  या ठिकाणी शास्त्रीय गायन, सुगम संगीत, हार्मोनियम वादन तसेच तबला वादनाचे नाममात्र शुल्कामध्ये प्रशिक्षण दिले जाते.  येथे प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी आता नामवंत ठिकाणी कार्यरत आहेत. संगीत क्षेत्रातील अनेक बारकावे विद्यार्थ्यांना कळावेत यासाठी संगीत अकादमीच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येत असतात.

शुक्रवार दि. 10 सकाळी 10 ते 11.30   या वेळेत हार्मोनियम तर सकाळी 11.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शास्त्रीय गायनाचे सेमिनार संपन्न होणार आहे.  जास्तीत-जास्त नागरिकांनी या सेमिनारचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.