संकर्षण आणि स्पृहानं केलं श्रोत्यांना हसता-हसता अंतर्मुख!

0
1

चिंचवड, दि.१०- महासाधू मोरया गोसावी महाराज समाधी संजीवन सोहळ्याच्या 464 व्या महोत्सवाच्या चौथ्या दिवशी स्पृहा जोशी आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या कार्यक्रमाने उपस्थित श्रोत्यांना मनमुराद हसवतानाच अंतर्मुखही केले.

महासाधू मोरया महाराज यांच्या 464 व्या संजीवन सोहळ्यात एकाहून एक दर्जेदार कार्यक्रम तेही विनामूल्य मोरया भक्तांसाठी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, जितेंद्र देव, ॲड. देवराज डहाळे, ॲड. राजेंद्र उमाप, केशव विद्वांस यांनी केले होते. कालचा महोत्सवातला अखेरचा पण मोरया भक्तांना चिरकाल आठवत राहील असा ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कविता, गप्पा, गाणी आणि बरेच काही असलेल्या कार्यक्रमाने उपस्थित दोन हजाराहूंन अधिक रसिकांना मनमुराद तर हसवलेच पण काही काही कवितांनी अंतर्मुख सुद्धा केले.

टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपल्या फिल्मी करियरला सुरुवात करून या दोन्ही प्रतिभावंत कलाकारांनी आपल्या अभिनय क्षमता आणि प्रतिभेच्या जोरावर असंख्य प्रेक्षकांच्या मनात आणि हृदयात स्थान मिळवले. आहे. आतापर्यंत देश-विदेशात 175 प्रयोग झालेल्या या कार्यक्रमाचा कालचा 176 वा प्रयोग होता.

कार्यक्रम सुरु झाला की, अगदी काही क्षणातच या जोडीने आपल्या कलाविष्काराच्या जोरावर प्रेक्षकांना आपलेसे केले आणि हा प्रभाव कार्यक्रम संपेपर्यंत कायम राहिला. आईवरची कविता, राजकीय कविता, माझं मत वाया गेलं, माझं नाव संकर्षण, विठोबा तू दिसलास की, या व अशा एकाहून एक दर्जेदार आणि कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी डोळ्यात टचकन पाणी आणणाऱ्या कवितांनी रसिकांनी मनमुराद आनंद दिला.

हा कार्यक्रम संपूच नये, असा प्रेमळ हट्ट रसिकांचा होता पण वेळ आणि नियम कोणालाच चुकत नाहीत या उक्तीनुसार ‘रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

विनय चेऊलकर आणि अतुल गोडसे यांनी की-बोर्ड व तबला साथ देत या प्रयोगाची रंगत वाढवली.

शिरस्त्याप्रमाणे विश्वस्त मंडळीनी कलाकारांचा यथार्थ सन्मान केला स्मिता जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.