संकटमोचक गिरीश महाजन महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी, फडणवीस प्रदेशाध्यक्ष

0
384

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनाम्याच्या तयारीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये यासाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांनी प्रचंड प्रयत्न केले. पण देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर महाराष्ट्रात भाजपचा उपमुख्यमंत्री कोण असेल? असा मोठा प्रश्न आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर भाजपचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले नेते गिरीश महाजन यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. कारण सध्याच्या घडीला महाराष्ट्रात भाजपमध्ये गिरीश महाजन यांचं नाव आघाडीवर आहे. गिरीश महाजन हे सध्या राज्यातील भाजपचे दोन नंबरचे नेते आहेत. त्यांची पक्षाचे संकटमोचक नेते म्हणून ख्याती आहे. याशिवाय ते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते आहेत.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आपल्याला पक्ष संघटनेसाठी उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीपासून मुक्त करावं, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या याच मागणीसाठी देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्यासमोर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आखलेल्या प्लॅनची ब्लू प्रिंट सादर केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे या बैठकीनंतर आज पुन्हा अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राज्यात भाजप ॲक्शन मोडवर आली आहे. भाजप विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा जनादेश यात्रा काढणार आहे. भाजप संपूर्ण राज्यात जनादेश यात्रा काढणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनादेश यात्रेचे नेतृत्व करणार आहेत. फडणवीस यांच्याकडून पक्ष संघटना, कामाची ब्ल्यू प्रिंट सादर करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात विभागवार भाजप जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे.

राज्यात देवेंद्र फडणवीस हे भाजपचे सध्याच्या घडीतील प्रमुख आणि सर्वात मोठे नेते आहेत. ते राज्याचे मुख्यमंत्री देखील होते. याशिवाय त्यांनी गृहमंत्रीपदही सांभाळलं आहे. देवेंद्र फडणवीस हे डॅशिंग नेते आहेत. त्यांना लोकसभेत भाजपचा झालेला पराभव जिव्हारी लागला आहे. आगामी काळात राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपचं पुन्हा नुकसान होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस आता पुन्हा शुन्यातून महाराष्ट्रात प्रयत्न करणार आहेत. ते राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांना आता सरकारमध्ये राहायचं नाही. त्यामुळे ते आपल्याकडे असणारी जबाबदारी कदाचित गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे.