दि.१७(पीसीबी)-श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ, चिंचवडगाव आयोजित पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवातील प्रथम पुष्प गुंफताना गायक, संगीतकार अवधूत गांधी आणि सहकारी यांनी श्रोत्यांना भक्ती – शक्तिगीतांची सुरेल अनुभूती सोमवार, दिनांक १६ मार्च २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ मंदिर प्रांगण, बुकॉऊ वुल्फ कॉलनी, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड) चिंचवडगाव येथे दिली. याप्रसंगी माजी नगरसेवक मधू जोशी, श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे – पाटील, उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, सचिव संजय आधवडे, खजिनदार गणपती फुलारी, सहसचिव मीनल देशपांडे, सदस्य शंकर बुचडे, नितीन चिंचवडे – पाटील, माधव कुलकर्णी आणि हेमा दिवाकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘अलंकापुरी ज्ञानभूमी पवित्र…’ या भक्तिरचनेने आणि ‘जय जय रामकृष्ण हरी…’ या सांगीतिक जयघोषात मैफलीचा प्रारंभ करण्यात आला. तुकाराम महाराजांच्या ‘रूप पाहता लोचनी…’ या रचनेला श्रोत्यांनी टाळ्या वाजवीत मुखाने ‘विठ्ठल’ , ‘विठ्ठल’ असा जयघोष करीत साथ दिली. ‘सुंदर ते ध्यान…’ आणि ‘काय सांगू देवा…’ या रचनांनी
भक्तिरसाचा परिपोष केला; तर ‘जिंकण्याचा मोह नाही, हरण्याचे भय नाही…’ या गीताला श्रोत्यांनी ‘श्री स्वामी समर्थ’ असा नामगजर करीत साथ देत वन्स मोअर दिला. श्रोत्यांना नकळत भक्तिरसाकडून वीररसात नेत तुकोबांच्या ‘हेचि येळ देवा…’ या अभंगाने भक्ती शक्तीचा अवघा रंग एकचि झाला, अशी अनुभूती भाविकांना प्राप्त झाली. गोंधळ आणि भारूड या पारंपरिक रचनांनंतर ‘आम्ही गड्या डोंगरचं राहणारं…’ आणि ‘देह विठ्ठल विठ्ठल झाला…’ या गीतांना भरभरून दाद मिळाली. ‘पावनखिंड’ या चित्रपटातील ‘युगत मांडली…’ तसेच छत्रपती शिवाजीमहाराज यांचे माहात्म्य वर्णन करणारे ‘रणी धाव तू मार्तंड…’ या गीतांना श्रोत्यांनी सामुदायिक गायनसाथ केली. उत्तरोत्तर रंगलेल्या या मैफलीचा समारोप ‘स्वामींचे हे देणे…’ या भैरवीने करण्यात आला. अभय नलगे (हार्मोनियम), पांडुरंग पवार (तबला), राजेंद्र बघे (मृदंग), प्रसाद भांडवलकर, हेमंत क्षीरसागर, प्रतीक डोळस आणि विजय सोनवणे (तालवाद्य) यांनी साथसंगत केली.
त्यापूर्वी, पहाटे ४:३० वाजता श्रींचा पंचामृताने अभिषेक करून प्रकटदिन उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. सकाळी उत्सव कलशाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर श्रींची आरती, मंडपपूजन, स्वामी स्वाहाकार, श्रीगुरुलीलाअमृत ग्रंथ पारायण सोहळा प्रारंभ, महानैवेद्य, माध्यान्ह आणि सायंआरती हे धार्मिक विधी संपन्न झाले. दुपारी ४ ते ५:३० या कालावधीत भजनसेवा रुजू करण्यात आली. कैलास भैरट यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.










































