श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराचा गुदमरलेला श्वास मोकळा होणार

0
11

सोलापूर, दि.26 (पीसीबी) : अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात तीर्थक्षेत्र विकासकामांसाठी रखडलेले भूसंपादन अखेर अक्कलकोट नगरपालिकेने हाती घेतले आहे. यात ११०६२ चौरस मीटर जमीन संपादित करण्यासाठी नगरपालिकेने प्रसिद्धीकरण केले आहे. एकीकडे राज्य शासनाने अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासकामांच्या आराखड्यास मंजुरी दिली असताना दुसरीकडे गेल्या ४० हून अधिक वर्षांपासून रखडलेले भूसंपादन करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आल्यामुळे आगामी काळात श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराचा गुदमरलेला श्वास मोकळा होणार आहे.

अक्कलकोट नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रमाकांत डाके यांनी दिलेल्या माहितीनुसार श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरातील जागा १९७८ साली शासनाने विकासासाठी आरक्षित केली होती. त्याप्रमाणे ही जागा संपादन करण्याची जबाबदारी श्री स्वामी समर्थ मंदिर समितीवर निश्चित करण्यात आली होती. त्यासंबंधी मंदिर समितीची नगरपालिका प्रशासनाने वेळोवेळी पत्रव्यवहारही केला होता. परंतु भूसंपादन रखडले होते. आवश्यक कालावधी टळल्यानंतरही भूसंपादन न झाल्यामुळे मूळ जागामालकांनी जागा खरेदी करण्यासाठी न्यायालयात धाव घेऊन नोटीस बजावली होती. कायदेशीर नियमानुसार आरक्षण निश्चित झाल्यानंतर पुढे एक वर्षाच्या मुदतीत जागा संपादित करणे आवश्यक आहे. अन्यथा आरक्षण रद्द होऊ शकते. त्यामुळे अक्कलकोट शहराचे मोठे नुकसान होऊ शकते. त्याचा विचार करूनच नगरपालिकेने जागा संपादनासाठी प्रक्रिया हाती घेतली आहे.

श्री स्वामी समर्थ मंदिरात आणि शेजारच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दररोज हजारो भाविक येतात. दर गुरुवारी, अमावास्या पौर्णिमेसह गुरूपौर्णिमा, इतर धार्मिक सण उत्सवात आणि शासनाच्या सुट्टी काळात येणाऱ्या भाविकांची संख्या अनेक पटींनी जास्त असते. परंतु मंदिर परिसरासह तेथील रस्ते चिंचोळे आहेत. इतर आवश्यक पायाभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. त्याचा विचार करून भूसंपादनाची प्रक्रिया जलदगतीने सुरू झाल्यामुळे श्री स्वामी भक्तांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.