श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात

0
401

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – रोटरी कल्ब ऑफ आकुर्डी आणि श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुजण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळी स्वामींचा अभिषेक होम हवन प्रतिष्ठानच्या पदाधिका-यांच्या हस्ते करण्यात आला. नंतर अनेक भजनी मंडळानी आपल्या सुमधुर स्वरांनी मंत्रमुग्ध करून स्वामींच्या चरणी सेवा अर्पण केली. संध्याकाळी गुरूजनांचा सत्कार करण्यात आला. दहावी, बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर, रोटरी क्लब आकुर्डीच्या अध्यक्षा कल्याणी कुलकर्णी, राजाराम सावंत, रवी नामदे, सुनील कदम उपस्थित होते.

पुण्यातील शाहू कॉलेजचे प्राचार्य प्रा.जितेंद्र होले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनीही स्वामी दर्शनाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. तसेच संगीत विशारद ॉ निवृत्ती धाबेकर गुरुजी व त्यांचा संच यांनी सुमधुर सुरांनी संगीत संध्या महफिल गाजवली. संध्याकाळी आरती करून महाप्रसादाचा लाभ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे नियोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. हरिनारायण शेळके यांनी केले. सूत्रसंचालन सारिका रिकामे यांनी केले. तर, अर्चना तौंदकर यांनी आभार मानले.