पिंपरी (दिनांक : २३ मार्च २०२३) चैत्र शुद्ध प्रतिपदा या तिथीनुसार बुधवार, दिनांक २२ मार्च २०२३ रोजी बुकॉऊ वुल्फ कॉलनी पटांगण, पिंपरी-चिंचवड लिंक रोड, चिंचवड येथे भक्तिमय वातावरणात पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. विधानपरिषद आमदार उमा खापरे, श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे, उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, सचिव संजय आधवडे, सहसचिव मीनल देशपांडे, कोषाध्यक्ष गणपत फुलारी यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्सवाच्या सायंकालीन सत्रात पंडित भवानीशंकर आणि पंडित राम मिस्त्री यांचे पट्टशिष्य तालमणी पंडित प्रताप पाटील (मुंबई) यांचे बहारदार पखवाजवादन झाले. त्यांना पंडित संगीत मिश्रा (सारंगी), कुणाल पाटील (तबला), मधुकर भोईर (संवादिनी) यांनी सुरेल साथसंगत केली.
तसेच यावेळी वैभव मंडलिक आणि योगेश नाईक यांचे सुश्राव्य गायन झाले. त्यांना भक्तराज पाटील यांनी साथसंगत केली. आमदार उमा खापरे यांच्या हस्ते सर्व कलाकारांंचा सन्मान करण्यात आला. कैलास भैरट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यापूर्वी, पहाटे ठीक ४:३० वाजता श्रींची पंचामृत अभिषेक पूजा संपन्न झाली. त्यानंतर सकाळी ६:०० वाजता उत्सव कलशाचे विधिवत पूजन करून स्थापना करण्यात आली. सकाळी ८:०० वाजता मंडप पूजन आणि त्यानंतर सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:०० या कालावधीत स्वामी स्वाहाकार यज्ञास सुरुवात झाली. दुपारी १२:०० वाजता आरती आणि महानैवेद्य अर्पण करण्यात आला. संपूर्ण दिवसभर भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ सदस्य शंकर बुचडे, नितीन चिंचवडे, विजय कुलकर्णी आदी सदस्यांनी संयोजनात परिश्रम घेतले.