श्री संत तुकाराम महाराज मंदिर दर्शनासाठी बंद राहणार

0
643

पिंपरी,दि.(पीसीबी) : श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मंगळवारी (दि.14) पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव 12 जून सकाळी 8 वाजल्यापासून 14 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत देहूगाव येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. अशी माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.

श्री संत तुकाराम महाराज यांच्या जन्मभूमी असलेल्या मावळ तालुक्यातील इंद्रायणीतीरावरील देहूनगरीत शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 जूनला होणार आहे. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून पंतप्रधानांच्या स्वागतासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर आवार, शिळा मंदिर, सभास्थानी तयारी सुरु आहे. दुपारी एक ते दोन या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होणार असून मंदिरातील सोहळा आणि वारीच्या अनुषंगाने वारकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे, सूत्रांनी सांगितले.

आषाढी वारी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे देहूनगरी मध्ये चैतन्याचे वातावरण आहे. श्री क्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज देवस्थानच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ असलेल्या शिळा मंदिराचा जिर्णोद्धार केला आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. देवस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाच्या वतीने तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून अद्यापही मिनिट टू मिनिट कार्यक्रम जाहिर केला नसला तरी नियोजनानुसार दुपारी एक ते दोन या वेळेत पंतप्रधान देहूनगरीत येणार आहेत.

देहूगाव येथे उभारण्यात आलेल्या हॅलीपॅडवर पंतप्रधानांचे आगमन होईल. त्यानंतर इंद्रायणीतीरावरील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वारकऱ्यांच्या वेशात पंतप्रधान येतील. विठूरायाचे दर्शन घेऊन शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात येईल. त्याचवेळी देवस्थानच्या वतीने तुकोबांची पगडी आणि उपरणे देऊन पंतप्रधानांचे स्वागत होईल. यावेळी मंदिरात निवडक वारकरी, सेवेकरी ही उपस्थित असणार आहेत.

या कार्यक्रमासाठी मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावरील माळवाडी हद्दीत 22 एकर जागेत बंदिस्त सभागृह तयार केले आहे. त्याठिकाणी 40 हजार वारकरी बसतील एवढी क्षमता आहे. तिथे पंतप्रधानांचे आगमन झाल्यानंतर देवस्थानच्या वतीने सत्कार केला जाईल. यानंतर अध्यक्षांचे मनोगत आणि त्यानंत पंतप्रधानांचे भाषण होईल.