श्री. भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट) निगडी तर्फे ११ ते १५ डिसेंबरला प्रवचन आणि धार्मिक कार्यक्रम

0
83

पिंपरी, दि. 09 (पीसीबी) : श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर (श्री. भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट) निगडी, प्राधिकरण यांच्या वतीने येत्या ११ ते १५ डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव तथा विश्वशांती महायाग याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती परमपूज्य श्री १०८ अमोघकीर्तीजी महाराज आणि परमपूज्य श्री १०८ अमरकीर्तीजी महाराज यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

निगडी प्राधिकरण येथील सेक्टर क्रमांक २७-अ नियोजित महापौर निवास मैदान, सिटी प्राइड शाळेजवळ भेळ चौक येथे हा महोत्सव होणार आहे. महोत्सवाच्या या पाच दिवसांमध्ये गर्भ कल्याणक, जन्म कल्याणक, राज्याभिषेक व दीक्षा कल्याणक, केवलज्ञान कल्याणक आणि निर्वाण मोक्षकल्याणक असे कार्यक्रम होतील.

महोत्सवामध्ये दररोज पहाटे पाच ते सहा या वेळेत मंगलवाद्य घोष केला जाणार आहे. सकाळी सात ते आठ या वेळेत पाच दिवस रोज लघुशांती, नित्यविधी, पंचामृत अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम होतील. ११ डिसेंबर रोजी बुधवारी सकाळी सात वाजता कंकण बंधन, ध्वजारोहण, मंडप उद्घाटन होईल. यावेळी मंगल कलश आणताना भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच पंचामृतअभिषेक महाशांतीधारा करण्यात येईल. सकाळी नऊ ते बारा या वेळेत पीठ यंत्र आराधना, वास्तुविधान, महायाग मंडल आराधना, चतुर्दिक्षु होम, नवग्रह होम, मृत्तिकासंग्रह बिजावाप अर्थात अंकुररोपण होईल. दुपारी दोन ते अडीच या वेळेत सुवर्ण सौभाग्यवती दाम्पत्याच्या हस्ते मंडपासमोर ध्वजारोहण, शांतीहोम, गर्भकल्याण तिथीपूजन केले जाईल. दुपारी साडेतीन ते पाच या वेळेत युगल मुनिराज मंगलप्रवचन आणि तज्ज्ञांचे व्याख्याने होतील. संध्याकाळी साडेसहा ते आठ या वेळेत तीर्थंकर मातापिता यांच्यासह अष्टकुमारिकांसह पूजामंडपात आगमन आणि आशिर्वाद, दीपोत्सव आदी कार्यक्रम होतील. रात्री आठ वाजता गर्भकल्याण नाटिका, संगीत आरती, विश्वशांती जप्यअनुष्ठान होईल.

दुसऱ्या दिवशी १२ डिसेंबर रोजी गुरुवारी सकाळी आठ वाजता भगवंत यांचा जन्मकल्याणक महोत्सव विधी तसेच जन्मकल्याणक नाटिका सादर होईल. त्यानंतर अकरा वाजता जन्मकल्याण तिथीपूजन होईल. दुपारी दोन वाजता युगल मुनिराजजी यांचे प्रवचन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन होईल. चार वाजता १००८ कलशांनी जन्माभिषेक आणि मिरवणूक काढण्याच येणार आहे. संध्याकाळी सात वाजल्यापासून जिनबालकांचे नामकरण, बालक्रीडा, संगीत, आरती विश्वशांती जाप्य अनुष्ठान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

तिसऱ्या दिवशी १३ डिसेंबर रोजी शुक्रवारी सकाळी नऊ वाजता द्वादश इंद्र-इंद्राणी यांच्या वतीने यागमंडल विधान होईल. दुपारी एक वाजता भगवंतांचा राज्याभिषेक, सन्मान, राजनृत्य होईल. दुपारी तीन वाजता युगल मुनिराजजा यांचे आदिनाथ भगवानजी यांच्या राज्यव्यवस्थेबाबतचे विशेष प्रवचन होईल. दुपारी चार वाजता वैराग्य नाटिका आणि दीक्षा संबंधी मुनींचे मार्गदर्शन होईल. संध्याकाळी सहा वाजता संगीत आरती, विश्वशांती जाप्य अनुष्ठान सांस्कृतिक कार्यक्रम होतील.

चौथ्या दिवशी १४ डिसेंबर रोजी शनिवारी सकाळी नऊ वाजता बालकांचा उपनयन संस्कार होईल. अकरा वाजता केवल ज्ञान कल्याण संस्कार, मालारूपण, केवल ज्ञान कल्याण तिथीपूजन, सहस्त्रनाम उद्घोष केला जाईल. दुपारी दोन वाजता युगल मुनिराजजी यांचे प्रवचन होईल. चार वाजता समवशरण रचना, पूजा, समोशरण परिक्रमा होईल, सात वाजता रथोत्सव होणार आहे. रात्री आठ वाजता आनंत नर्तन संगीत आरती, जाप्य अनुष्ठान आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतील.

पाचव्या दिवशी १५ डिसेंबर रोजी रविवारी सकाळी नऊ वाजता भगवानजी यांचे निर्वाण कल्याणक महोत्सव, अकरा वाजता १०८ कलशांचा महामस्तकाभिषेक, दुपारी २ वाजल्यापासून युगल मुनिराजजी यांचे प्रवचन, संघ पूजा, सत्कार, कंकणविमोचन, पूजा विसर्जन, अन्य धार्मिक कार्यक्रम आणि भव्य मिरवणूक निघेल.

महोत्सवाच्या आदल्या दिवशी १० डिसेंबर रोजी मंगळवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत मंदिराच्या आवारात इंद्र-इंद्राणी यांचा हळदी कार्यक्रम होईल. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये समाजातील बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पंचकल्याणक महामहोत्सव समिती आणि सकल जैन समाज पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने करण्यात आले आहे. श्री भगवान महावीर अहिंसा ट्रस्टचे अध्यक्ष अजित पाटील, वीरेंद्र जैन, सुदीन खोत, शांतीनाथ पाटील, उमेश पाटील, धनंजय चिंचवडे, अविनाश भोकरे, विजय भिलवडे, प्रकाश शेडबाळे, सुरगोंडा पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी संयोजन केले आहे