श्री नामदेवमहाराज संजीवन समाधी सोहळ्याची तयारी पूर्ण

0
106

पिंपरी, दि. ३० पिंपरी – चिंचवड नामदेव शिंपी समाज संस्थेच्या वतीने शुक्रवार, दिनांक ०२ ऑगस्ट २०२४ अर्थात आषाढ कृष्ण त्रयोदशी रोजी संत शिरोमणी नामदेवमहाराज यांच्या ६७४ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी – चिंचवड नामदेव शिंपी समाज संस्थेचे अध्यक्ष एकनाथ सदावर्ते यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, ‘एक दिवस समाजासाठी’ या भावनेतून पिंपरी – चिंचवड विभागातील सर्वात भव्य आणि मुख्य श्री संत नामदेव महाराज मंदिर व सांस्कृतिक सभागृह, साठे मळा, वाल्हेकरवाडी रस्ता, चिंचवड येथे सकाळी आठ वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी आणि नामदेवमहाराज यांच्या मूर्तींना अभिषेक, सत्यनारायण महापूजा करून सोहळ्याचा प्रारंभ होईल. त्यानंतर सकाळी दहा ते बारा या वेळेत श्री मोरया गोसावी मंदिर ते संत नामदेवमहाराज मंदिर या मार्गावर भव्य पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच वेळेस मंदिरात भाविकांना भजनाचा आनंददेखील घेता येईल. पालखीचे आगमन मंदिरात होताच ठीक बारा वाजता नामदेवमहाराजांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी आणि विधिवत आरती करून समाधी सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम संपन्न होणार आहे.

दुपारच्या सत्रात संस्थेच्या कार्याचा अहवाल वाचन आणि देणगीदारांचा सत्कार झाल्यानंतर लगेच एक ते तीन या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर संस्थेच्या आजीव सभासदांच्या उपस्थितीत वार्षिक सर्वसाधारण सभा व नवीन कार्यकारिणीची निवड होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. या सोहळ्यात सर्व समाजबांधव आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन एकनाथ सदावर्ते यांनी केले आहे.