श्री तुळजाभवानी मातेच्या चलमूर्ती चा मूळ फोटो आणि थोडक्यात माहिती !

0
44

दि.२५(पीसीबी) – तुळजाभवानीची मूर्ती ही चल मूर्ती असून काळ्याभोर गंडकी पाषाणातून बनविलेली ही मूर्ती साधारणपणे साडेतीन फूट आकाराची अष्टभूजा मूर्ती असून मंदिरातील गाभाऱ्यात सिंहासनावरील एका खाचेत बसविली जाते. मूर्तीला सिंहासनावरील खाचीत बसविण्याकरिता दीड फूट लांबीचा क्रुस मूर्तीच्या खालच्या बाजूला असून मूर्ती घट्ट बसावी म्हणून मेण बसविले जाते. याकरिता मूर्तीच्या खालच्या बाजूला ६’’ लांबीचा क्रूस ठेवलेला आहे. त्यामुळे तुळजाभवानीची मूर्ती बाहेर काढून प्रत्यक्ष विधीकरिता वापरली जाते. ही एक अनोखी प्रथा आहे.

साडेतीन शक्तिपीठांत तुळजापूर प्रथा-परंपरा, पूजाअर्चा याबाबतीतच नव्हे तर देवीची मूर्ती अशा सर्वच बाबतीतली भिन्नता आहे. माहूरला मूर्तीऐवजी तांदळा आहे तर वणीला एका मोठय़ा दगडावर देवी प्रतिमा शिल्पांकन करण्यात आलेली आहे. मूर्तिशास्त्रानुसार कोल्हापूर आणि तुळजापूरच्या मूर्तीत काही प्रमाणात साम्य असले तरी तुळजाभवानीची मूर्ती पूर्णत: चलमूर्ती म्हणजे उत्सवाला बाहेर काढून परत त्याच ठिकाणी बसविली जाते.

वीरांची देवता महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजापूरची श्री तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही पूर्ण पीठं तर वणीची सप्तशृंगी हे अर्धपीठ म्हणून परिचित आहे.