श्रीलंकेत मोठे अराजक, राष्ट्रपतींचे पलायन

0
171

कोलंबो, दि. ९ (पीसीबी) : ऐतिहासिक आर्थिक मंदीचा सामना करत असलेल्या श्रीलंकेतही राजकीय अस्थिरता वेगानं पसरत आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज (शनिवार) मोठ्या प्रमाणात आंदोलन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राष्ट्रपती राजपक्षे यांच्या निवासस्थानाला आंदोलकांनी वेढा घातल्यामुळं ते पळून गेल्याचं वृत्त एएफपी वृत्तसंस्थेनं दिलंय. देशात शांतता-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि निदर्शनं नियंत्रणात ठेवण्यासाठी शुक्रवारी रात्री 9 वाजल्यापासून पश्चिम प्रांतातील अनेक पोलीस विभागात कर्फ्यू लागू करण्यात आलाय. कर्फ्यूचं उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशारा पोलीस प्रशासनानं दिलाय. गगनाला भिडलेल्या महागाईच्या काळात इंधनाअभावी जनतेचा संताप पहायला मिळतोय.

श्रीलंकेच्या द कोलंबो पेज वृत्तपत्रानुसार, खबरदारीचा उपाय म्हणून पश्चिम प्रांतातील नेगोंबो, केलानिया, नुगेगोडा, माउंट लॅव्हिनिया, कोलंबो नॉर्थ, कोलंबो दक्षिण आणि कोलंबो सेंट्रल पोलिस विभागात कर्फ्यू लागू करण्यात आलाय. कर्फ्यू भागात प्रवास करण्यास सक्त मनाई असून पोलिसांनी लोकांना इतर पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिलाय. विशेष म्हणजे, गेल्या अनेक आठवड्यांपासून आर्थिक परिस्थितीमुळं तणाव वाढलाय. पेट्रोल पंपांवर नागरिक-पोलीस दलाचे सदस्य आणि सशस्त्र दल यांच्यात हिंसक चकमकी झाल्याच्या बातम्या आहेत. श्रीलंकेतील लोकांना इंधन मिळवण्यासाठी काही तास किंवा काही दिवस रांगेत उभं राहावं लागतंय. हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा अनेक वेळा वापर केलाय.