श्रीरंग बारणे, महेश लांडगेंची सद्दी संपणार मंत्रीपदाची हुलकावणी, अजित पवार सर्वेसर्वा

0
586

पिंपरी, दि. ०२ जुलै (पीसीबी) – अजित पवार हे उभी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप बरोबर घेऊन गेल्याने या घडामोडींचा मोठा परिणाम पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणावरही होणार आहे. शहरात राष्ट्रवादी आणि भाजप हेच दोन प्रमुख पक्ष होते आणि त्यांचीच ताकद निर्णायकी होती. आता ठाकरे यांची शिवसेना वगळून भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार म्हटल्यावर विरोधकच शिल्लक राहणार नाही, अशी स्थिती आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे भाजपच्या हातातून पिंपरी चिंचवड शहर आता पुन्हा अजित पवार यांच्या हातात जाणार आहे. भोसरी, चिंचवड आणि पिंपरी या तीनही मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादीचेच कसे असतील यासाठी अजित पवार पुन्हा प्रयत्न कऱणार. आपापला पक्ष वाढविण्याचा अधिकार असल्याने ते भाजपला दाबण्याचा प्रयत्न कऱणार हेसुध्दा खरे आहे.

आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निव़डणुकीत एकत्र लढणार असल्याचे स्वतः अजित पवार यांनीच स्पष्ट केल्याने अजितदादा पुन्हा शहरावर कब्जा मिळविणार हे सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. याचाच दुसरा अर्थ भाजपचे भोसरीकर आमदार महेश लांडगे यांचा महापालिकेवर जो ताबा होता तो संपणार आहे. आता अजितदादांना शरण जाण्याशिवाय आमदार लांडगे यांना दुसरा पर्याय उरलेला नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीने आमदार लांडगे यांनी जोरदार तयारी सुरू केली होती, आता तिथेही पुन्हा राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे.

श्रीरंग बारणे यांचीही कुचंबना –
भोसरीकर आमदार महेश लांडगे यांच्या प्रमाणेच शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांचे महापालिकेच्या कारभारावर वर्चस्व निर्माण झाले होते. महापालिका आयुक्त शेखर सिंग यांची नियुक्तीसुध्दा बारणे यांच्या सुचनेनुसार झाली होती. मोठ मोठे प्रकल्पसुध्दा बारणे यांच्या आदेशानुसार प्रस्तावित होते. आता अजित पवार यांची हस्तक्षेप वाढणार असल्याने बारणे यांची सद्दी संपण्याची शक्यता आहे. राज्यात मंत्रीमंडळ विस्तार करणार आणि केंद्रातही शिंदे गटाला जागा देणार, अशी शक्यता होती. आता त्या सर्व शक्यता संपल्या आहेत. कारण शिंदे गटाचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार होते, आता ते अशक्य दिसते आहे. कारण राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांनी संधी मिळणार आहे.