….
३७५ धर्मध्वजधारी, कलशधारी, तुलसीधारी
तुकाराम नावांच्या ३७५, ज्ञानेश्वर नावांच्या ७५० व्यक्ती होणार सहभागी
गाथापारायणामध्ये ५००० गाथावाचक, १००० टाळकरी, प्रतिदिन २५ मृदुंग वादक
२४ तास ज्ञानदेव- श्री तुकाराम भजन प्रहर
- एक लक्ष भाविकांना मुळशी तालुक्यातर्फे पुरणपोळीचे भोजन आणि प्रतिदिन श्री संत ज्ञानेश्वर जीवन चरित्र कथा वाचन होणार*
…
मावळ तालुक्यातील इंदोरी श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडार डोंगर ट्रस्ट यांच्यावतीने दिनांक २२ ते ३१ जानेवारी भंडारा डोंगराच्या पायथ्याशी अखंड हरिनाम सप्ताह, संगीत गाथा पारायण तथा ग्रंथराजी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सोहळ्याचे संयोजक ह. भ. प ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी मंगळवारी दुपारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे विश्र्वस्त माणिकमहाराज मोरे, पंढरपुर देवस्थानचे विश्र्वस्त शिवाजीमहाराज मोरे, बाळासाहेब जांभुळकर वारकरी संप्रदायातील भक्तजण उपस्थित होते.
मावळातील भंडारा डोंगराच्या पायथ्याशी वारकरी संप्रदायातील वैभवी धार्मिक सोहळा होणार आहे. सालाबाद प्रमाणे होणाऱ्या या सोहळ्यामध्ये राज्यभरातून वारकरी सहभागी होणार आहेत. भंडारा डोंगराच्या पायथ्याशी हा सोहळा होणार असून त्यासाठी भव्य मंडप उभारण्यात येणार आहे, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर संस्थान मावळ, श्री क्षेत्र घोरवाडेश्वर डोंगर, श्री क्षेत्र भामचंद्र डोंगर या विश्वस्तांच्या सहकार्याने हा सोहळा होणार आहे, असे हभप ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम यांनी सांगितले.
वारकरी संतांच्या सेवेशी सोहळा !
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७५० वा जन्म सोहळा श्री संत नामदेव महाराज संत जनाबाई व आदी १४ संतांचा ६७५ वा समाधी सोहळा, संत सावता महाराज यांचा ७७५ वा जन्मोत्सव सोहळा, संत जनार्दनपंत देशपांडे देवगिरी यांचा ४५० वा संजीवन समाधी सोहळा, श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज ३७५ वा सदेह वैकुंठ गमन सोहळा व श्री तपोनिधी नारायण महाराज देहूकर यांचा ३७५ वा जन्मसोहळा या निमित्ताने गाथा पारायण सोहळा होणार आहे.
…
३७५ धर्मध्वजधारी, कलशधारी, तुलसीधारी आणि तुकाराम नावांच्या ३७५, ज्ञानेश्वर नावांच्या ७५० व्यक्ती सहभागी!
भंडारा डोंगराच्या पायथ्याशी हा वारकरी संप्रदायाचा वैभवी सोहळा होणार असून गुरुवार, दिनांक २२ जानेवारीला दुपारी तीन ते पाच वाजता श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायथा येथपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये ३७५ धर्मध्वजधारी, कलशधारी, तुलसीधारी, कीर्तनकार, टाळकरी, मृदुंग सेवक, ब्रह्म विनाधारी, चोपदार सहभागी होणार आहेत. तर तुकाराम नावांच्या ३७५ व्यक्ती, ज्ञानेश्वर नावांच्या ७५० व्यक्ती, नामदेव नावाच्या व्यक्ती ६७५, जनाबाई नावाच्या ६७५ महिला सहभागी होणार आहे.
….
सोहळ्यात दररोज काय होणार
दररोज पहाटे चार ते सहा वेळात काकडा, सकाळी सहा ते अकरा या वेळेत गाथा पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी ११ ते साडेबारा कीर्तन, दुपारी एक ते तीन भोजन व वारकरी नित्यनेमाचे भजन, सायंकाळी तीन ते साडेतीन वाजता हरिपाठ, दुपारी साडेतीन ते साडेपाच संत चरित्रकथा, सायंकाळी सहा ते आठ कीर्तन, रात्री आठ ते दहापर्यंत भोजन व त्यानंतर हरी जागर होईल.
…
ही आहेत सोहळ्याची वैशिष्ठये
१) गाथापराणामध्ये ५०००गाथावाचक, १००० टाळकरी, प्रतिदिन २५ मृदुंग वादक, २४ तास ज्ञानदेव- श्री तुकाराम भजन प्रहर.
२) एक लक्ष भाविकांना मुळशी तालुक्यातर्फे पुरणपोळीचे भोजन
३) प्रतिदिन दुपारी साडेतीन ते पाच या वेळेत श्री संत ज्ञानेश्वर जीवन चरित्र कथा वाचन ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज.
४) बुधवारी २८ जानेवारीला दुपारी एक वाजता डॉ रामचंद्र देखणे कला प्रबोधिनीतर्फे डॉ भावार्थ देखणे आणि अवधूत गांधी यांचे बहुरूपी भारूड कार्यक्रम.
…
नामवंत कीर्तनकारांची होणार सेवा
गुरुवारी सायंकाळी सहा ते सात या वेळेत शांतीब्रह्म मारोती बुवा कुर्हेकर यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर दररोज सकाळी अकरा आणि सायंकाळी ५ या वेळेत कीर्तनसेवा होणार आहे. वसंतपंचमीच्या दिवशी शुक्रवारी सकाळी ११ ला हभप बंडा तात्या कराडकर यांचे कीर्तन होईल. शनिवारी विदर्भरत्न रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर, रविवारी हभप जयवंत महाराज बोधले, सोमवारी चैतन्य महाराज देगलूरकर, मंगळवारी हभप अच्युत महाराज दस्तापुरकर, बुधवारी गाथा मूर्ती ज्ञानेश्वर महाराज कदम, गुरुवारी श्री गुरु केशव महाराज नामदास, शुक्रवारी ज्ञानेश्वर महाराज कदम यांचे कीर्तन होणार आहे. माघ शुद्ध त्रयोदशीला शनिवारी सकाळी ९ ला ह भ प ज्ञानेश्वर माउली महाराज कदम यांचे कीर्तन होणार आहे.
पर्यावरण सप्ताह
देशात आणि जगात पर्यावरण आणि प्रदूषण यांचे संतुलन बिघडल्याने मानव जातीवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. एक हजार वर्षांपूर्वी आपल्या साधुसंतांनी पर्यावरणावर अभंगाद्वारे जनजागृती केलेली आहे. त्यामुळे देहू भंडारा डोंगर इथे होणाऱ्या कार्यक्रमात पर्यावरण सप्ताह पाळला जाणार आहे . कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनात द्वारे समाजाला बोध करावा असे आव्हान संयोजकांनी केले आहे. संत तुकाराम महाराज यांच्या प्रगटदिनी मागील दशमीला 375 देशी वृक्षांची लागवड केली जाणार आहे.










































