श्रीक्षेत्र देहू आणि भंडारा डोंगर येथे भव्य स्वच्छता अभियान संपन्न

0
4

देहू │ जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३७५व्या बीज सोहळ्यानंतर, *डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने व पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॅा. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॅा. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शना नुसार आज श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमात पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील दीड ते दोन हजार श्रीसदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. “स्वच्छ देहू, पवित्र देहू” या संकल्पनेला बळ देत, सर्व श्रीसदस्यांनी देहू गाव मुख्य रस्ते,देहू मंदिर परिसर, इंद्रायणी नदी किनारा, गाथा मंदिर तसेच भंडारा डोंगरातील पवित्र स्थळे स्वच्छ केली.

अभियानाची वैशिष्ट्ये:

हजारोंच्या संख्येने श्रीसदस्यांचा सहभाग –
सकाळपासूनच श्रीसदस्य देहू आणि भंडारा डोंगर परिसरात पोहोचले.सुमारे दीडहजार श्रीसदस्यांनी अवघ्या दोन तासांत ( सकाळी ६.०० ते ८.०० दरम्यान )श्रीक्षेत्र देहू परिसर स्वच्छ केला.

स्वच्छता आणि जनजागृती – प्लास्टिक कचरा, पत्रावळी, तसेच अन्य कचऱ्याची सफाई करून परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्व लोकांपर्यंत पोहोचविण्यात आले.

वारकरी संप्रदायाच्या पवित्र भूमीचे जतन –
संत तुकाराम महाराज यांचा पवित्र देहू स्थळ स्वच्छ आणि सुशोभित ठेवण्याचा संदेश.

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान दरवर्षी विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवते. यंदा संत तुकाराम महाराजांच्या बीज सोहळ्यानंतर देहू आणि भंडारा डोंगर येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

स्थानिक ग्रामपंचायत,प्रशासन, वारकरी संप्रदाय, आणि नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत ” प्रत्येकाने कर्तव्य म्हणून स्वच्छतेबाबत जागरूक रहात स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा” असा संदेश दिला.