चिखली दि . २८ ( पीसीबी ) — आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि त्यानिमित्ताने सालाबादप्रमाणे चिखली येथून घोराडेश्वर डोंगरावर जाणारी पारंपरिक पायी कावड यात्रा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडली.
विश्व हिंदू परिषद बजरंग दल चिखली प्रखंड आणि व्यापारी संघटना चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही ही यात्रा आयोजित करण्यात आली होती. ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज मंदिरात सकाळी पुजन व आरती करून यात्रेला विधिवत प्रारंभ करण्यात आला.
यात्रेच्या निमित्ताने श्रीघोराडेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक टाळ, मृदंग, जयघोष आणि हरहर महादेवच्या घोषात सहभागी झाले होते. संपूर्ण मार्ग भक्तिमय जयघोषांनी आणि “बोल बम” च्या निनादाने गजबजला होता.
ही कावड यात्रा चिखली परिसरातील धार्मिक एकोप्याचे व श्रद्धेचे प्रतीक मानली जाते. सुरळीत आणि सुरक्षित मार्गक्रमणासाठी स्वयंसेवक, आयोजक आणि पोलिस प्रशासनानेही योग्य ती तयारी ठेवली होती.
श्रावण सोमवारच्या निमित्ताने घेण्यात आलेली ही यात्रा धार्मिक श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक ऐक्य याचे प्रतीक ठरली.