शेलपिंपळगाव मधील दारूभट्टीवर गुन्हे शाखेचा छापा

0
66

चाकण, दि. २६ (पीसीबी) : खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे भीमा नदीच्या काठावर सुरू असलेल्या दारूभट्टीवर गुन्हे शाखा युनिट तीनने छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी 2000 लिटर कच्चे रसायन नष्ट केले. ही कारवाई बुधवारी (दि. 25) दुपारी तीन वाजताच्या सुमारास करण्यात आली.

राहुल रजपुत (रा. दौंडकरवाडी, पिंपळगाव, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार ऋषिकेश भोसले यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेलपिंपळगाव येथे भीमा नदीच्या काठावर किरण दौंडकर यांच्या शेतात बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. या कारवाईमध्ये 70 हजार रुपये किमतीचे 2000 लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.