दि. २९ ( पीसीबी )कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यूमागील नेमकं कारण अखेर समोर आलं आहे. 27 जून 2025 रोजी वयाच्या 42व्या वर्षी निधन झालेल्या या अभिनेत्रीच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार, मृत्यूचं मुख्य कारण ब्लड प्रेशर खालावणं आणि हृदयविकाराचा झटका असल्याचं स्पष्ट झालं आहे.
त्या दिवशी त्यांच्या घरी एक धार्मिक पूजा होती, आणि त्यांनी संपूर्ण दिवस उपवास केला होता. उपवास, थकवा आणि इतर आरोग्यविषयक उपचार यांचा एकत्रित परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला, असं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट होतंय.
अँटी-एजिंग इंजेक्शनने बिघडली प्रकृती? :
मिळालेल्या माहितीनुसार, शेफाली जरीवालाने मृत्यूपूर्वी रात्री अँटी-एजिंगचं इंजेक्शन घेतलं होतं, जे ती गेल्या काही वर्षांपासून दर महिन्याला घेत होती. हे इंजेक्शन तिला एका डॉक्टरच्या सल्ल्यानुसार सुरू करण्यात आलं होतं. दिवसभर उपवास आणि रात्री इंजेक्शननंतर जेवताना ती अचानक बेशुद्ध पडली आणि तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
या औषधांचा संभाव्य साइड इफेक्ट, उपवासामुळे आलेली कमजोरी आणि अचानक घडलेली ही घटना एकत्रित पाहता, मृत्यूचं कारण अधिक तपासण्याची गरज असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पोस्टमॉर्टेम रिपोर्टनंतरही पोलिस तपास थांबलेला नाही. शेफालीच्या पती पराग त्यागी, आई, घरगडी आणि हॉस्पिटलच्या डॉक्टरांसह एकूण ८ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यांच्या घरातून अँटी-एजिंग वायल्स, व्हिटॅमिन सप्लिमेंट्स आणि अन्य औषधं जप्त करण्यात आली आहेत.