शेतकऱ्यांची व्यथा ! कांद्याला ५० पैसे किलोचा दर; ३६ पिशव्या विकून शेतकऱ्याच्या हाती आले अवघे ८४९ रुपये

0
63

सोलापूर, दि. 05 (पीसीबी) : येथील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आठ दिवसांत साडेतीन हजारांहून अधिक गाड्या कांदा विक्रीसाठी आला आहे. पण, त्यात पावसाने भिजलेला खराब कांदा मोठ्या प्रमाणावर आहे. सोलापूर बाजार समितीत कांदा विकलेल्या तीन शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर त्यांची व्यथा मांडली. त्यांच्या ३६ पिशव्या (१६७९ किलो) कांद्याला प्रतिकिलो ५० पैसे दर मिळाला आहे.

सध्या सोलापूर बाजार समितीत कर्नाटक (कलबुर्गी, विजयपूर), सोलापूर, धाराशिव, लातूर, नाशिक, फलटण, पुणे अशा विविध भागातून कांदा विक्रीस येत आहे. आता एक पिशवी कांदा बाजारात आणायला ३० रुपयांचे भाडे द्यावे लागत आहे. याशिवाय कांदा गाडीत भरण्यासाठी देखील प्रत्येक पिशवीसाठी दहा रुपये मोजावे लागत आहेत. बारदाना (कांदा पिशवी) २५ ते ३० रुपयाला आहे.

सगळे भाव वाढलेले असताना कांद्याच्या दरात मात्र दिवसेंदिवस घसरण होत असल्याने बळिराजा चिंतेत असल्याची स्थिती आहे. २९ ऑक्टोबरला विष्णू हेडे, हणमंत शेळके, बिभिषण गावडे या शेतकऱ्यांच्या कांद्याला सरासरी दर ५० पैसे मिळाला आहे. त्यांच्या बिलाच्या पावत्या सोशल मीडियावर प्रसारित झाल्या आहेत. दरम्यान, बाजार समितीत आता गुरुवारपासून रविवारपर्यंत सुट्या असल्याने सध्या आवक वाढली आहे. त्यामुळे देखील भाव कमी झाल्याचे सांगितले जात आहे. सरासरी भाव १५०० पर्यंत असून सर्वाधिक भाव (नवीन कांद्याला) चार हजारांपर्यंत आहे. पण, तो सरसकट सर्वच शेतकऱ्यांना मिळत नाही, अशी वस्तुस्थिती आहे.

जिल्ह्यातील शेतकरी चांगला भाव मिळेल या आशेने बाजारात कांदा विक्रीसाठी घेऊन येत आहे. पण, सोलापूर बाजार समितीत तीन शेतकऱ्यांना ३६ पिशव्या कांदा (एक हजार ६७९ किलो) विकून त्यांच्या हातात केवळ ८४९ रुपये आले आहेत. एका शेतकऱ्याच्या आठ पिशव्या (३८० किलो) कांदा होता, त्यांना खर्च वजा करून केवळ १५५ रुपये मिळाले. दुसऱ्या शेतकऱ्याच्या १५ पिशव्याला (६९० किलो) ४५३ रुपये तर १३ पिशव्या (६०९ किलो) विकलेल्या शेतकऱ्याच्या हाती अवघे २४१ रुपये मिळाल्याची वस्तुस्थिती आहे. कांदा लागवडीपासून मशागत, खते व कांदा काढणी, भरणी हा संपूर्ण खर्च शेतकऱ्याला स्वत:च्या खिशातून भरावा लागत असल्याचेही चित्र आहे.