अमरावती, दि. ०५ (पीसीबी) : कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातून त्यांच्या मनात सरकारबद्दलचा रोष वाढत चालला आहे. विशेष म्हणजे याच रोषातून अमरावतीत एक धक्कादायक प्रकार बघायला मिळाला. अमरावतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर कांदा फेकण्याचा प्रयत्न केला. पण कांदा फेकण्याआधीच पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतलं. मिळालेल्या माहितीनुसार, कांदा फेकणारे तरुण हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.
विशेष म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच हा प्रकार घडलेला नाही. तर कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नाशिकमध्ये निफाड तालुक्यात केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यासोबत देखील असाच काहीसा प्रकार समोर आला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आज थेट भारत पवार यांना घेराव घातला. निफाडमधील शिरसागाव येथे हा प्रकार घडला. नाफेडमार्फत कांद्याची खरेदी व्हावी, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे.
कांद्याची खरेदी अजूनही सुरु झालेली नाही?
दरम्यान, सरकारच्या आश्वासनानंतरही काही ठिकाणी कांदा खरेदी सुरु नसल्याची तक्रार सुरु आहे. त्याशिवाय कांद्याच्या दरावरुन विरोधकांनी ठिकठिकाणी आंदोलनं सुरु केलीयत. संगमनेरमध्ये काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी ठिय्या आंदोलन केलं. तर नगर पुणे महामार्गावर राष्ट्रवादीच्या निलेश लंकेंनी कांदा दरासाठी रास्ता रोको केला. नाफेडनं खरेदीचा वेग वाढवावा आणि कांद्याला अनुदान देण्याची मागणी त्यांनी केलीय.
सरकारच्या आश्वासनानंतरही नाफेडनं कांदा खरेदी न सुरु केल्याच्या बातम्या आल्यानंतर लासलगावात नाफेडनं नेमलेल्या उप कंपन्यांकडून कांदा खरेदी होतोय. त्याठिकाणी कांद्याला 931 रुपये भाव मिळालाय. पण इतर काही ठिकाणी कांदा खरेदीसाठी असंख्य अटी घातल्या गेल्या आहेत. खरेदीआधी कांद्याची प्रतवारी ठरवली जातेय.
कांदा खरेदीसाठी नेमक्या कोणकोणत्या अटी?
कांदा 45 ते 55 मिलिमीटर आकाराचा असावा, रंग उडालेला नसावा, कांद्याला विळा लागलेला नसावा, पत्ती उडून कोंब फुटलेला नसावा अशा अनेक अटी लावल्या जातायत. याशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, 7/12 खरीप हंगाम पीक पेरा असे नियम घालून देण्यात आले आहेत.
कांदा खरेदीच्या आकडेवारीवरुन आधीच विरोधकांनी आक्षेप घेतला होता. 28 फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाख शिंदेंनी नाफेडद्वारे २.३८ लाख टन कांदा खरेदी केल्याचा दावा केला. मात्र ही आकडेवारी गेल्या रब्बी हंगामातली असल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला. त्यात नाफेडनं सुद्धा 28 फेब्रुवारीला ट्विट करत ३ दिवसात 637.38 टन कांदा खरेदी केल्याचं ट्विट केलं होतं.