शेतकरी कर्जमाफीवर संभ्रम; अतिवृष्टीग्रस्तांना लाभ मिळणार का?

0
26

दि.०८ (पीसीबी) – राज्य शासनाने नुकतीच ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली असली, तरी या योजनेत अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकरी वंचित राहतील का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जासाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली. तसेच जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात, त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणाही करण्यात आली.

मात्र, गेल्या वर्षी जून, जुलै आणि ऑगस्ट २०२५ या काळात राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. नदीकाठच्या भागातील शेतकरी विशेषतः मोठ्या संकटात सापडले होते. त्यावेळी सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली होती, मात्र ती तुटपुंजी असल्याची टीका विरोधकांनी केली होती.

आता जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी योजना ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या कर्जावर लागू असल्याने, त्याआधी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल का याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकरी या योजनेपासून वंचित राहतील का, अशी भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, २ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज कोणत्याही अधिकृत बँकेने दिलेले असले तरी राज्य सरकार माफ करणार आहे. ३० जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असून यासाठी समिती काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली.तरीही, अतिवृष्टी आणि पूरामुळे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार का, याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.