शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर लष्करप्रमुखांनी जनतेशी साधला संवाद,

0
107

दि. ५ ऑगस्ट (पीसीबी) – बांगलादेशमध्ये गेल्या महिन्याभरापासून चालू असलेल्या घडामोडींची टोकाची परिणती आज पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याने गाठली गेली. सरकारी नोकऱ्यांमध्ये देण्यात आलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा हिंसाचार थेट बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानापर्यंत पोहोचला. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून त्यांनी थेट देश सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं आहे. दुसरीकडे देशात थेट लष्कर प्रमुखांनी देशवासीयांशी संवाद साधला आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेश पुन्हा एकदा अस्थिरतेच्या वाटेवर असल्याचं दिसून येत आहे.
काय घडतंय बांगलादेशमध्ये?

बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये १९७१ च्या युद्धातील वीरांच्या नातेवाईकांना ३० टक्के आरक्षित जागा ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला. त्याला सामान्य तरुण वर्गातून मोठा विरोध निर्माण झाला. तरुणांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली. महिन्याभरापूर्वी झालेल्या या निदर्शनांमध्ये काही तरुणांचा मृत्यूही झाला. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं. सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण ५ टक्क्यांपर्यंत कमी करून त्यातील फक्त ३ टक्के वीरांच्या नातेवाईकांना आरक्षित ठेवण्याचा निकाल दिला. पण यादरम्यान पोलीस, सरकारी सुरक्षा दलांकडून करण्यात आलेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून निषेध मोर्चे काढण्यात आले. यातून पुन्हा हिंसाचार होऊन १००हून अधिक जण मृत्यूमुखी पडले.

या पार्श्वभूमीवर एकीकडे सरकारकडून देशभर अनिश्चित काळासाठी जमावबंदी लागू केलेली असताना दुसरीकडे संतप्त जमावाने थेट ढाक्यापर्यंत निषेध मोर्चाचं आयोजन केलं. यातून पुन्हा परिस्थिती चिघळली. जमावाकडून सातत्याने शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. अखेर शेख हसीना यांनी राजीनामा दिला. त्यांनी भारतात आश्रय घेतल्याचं बोललं जात आहे.

लष्कर प्रमुखांनी साधला देशवासीयांशी संवाद

एकीकडे पंतप्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर विदेशात आश्रयासाठी कूच केलं असताना दुसरीकडे बांगलादेशातील सामान्य नागरिक आक्रमक झाले असून राजधानीत शेख हसीना यांच्या शासकीय निवासस्थानात आंदोलनकर्ते शिरले आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून खुद्द लष्कर प्रमुखांनी जनतेशी संवाद साधला. त्याआधी त्यांनी बांगलादेशमधील सर्व राजकीय पक्ष, संघटना व पदाधिकाऱ्यांशी संवाध साधला.

“देशात कर्फ्यू किंवा आणीबाणी लागू करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. सध्याच्या परिस्थितीत निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर आम्ही आज रात्रीपर्यंत तोडगा काढू. बांगलादेशमध्ये सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इथलं लष्कर अंतरिम सरकार स्थापन करेल. देशभरात उसळलेल्या हिंसाचाराची पूर्ण जबाबदारी लष्करप्रमुख म्हणून मी घेतो. माझं आंदोलकांना आवाहन आहे की त्यांनी त्यांचं आंदोलन मागे घ्यावं”, असं बांगलादेशचे लष्करप्रमुख वकेर-उझ-झमन यांनी देशवासीयांना उद्देशून म्हटलं आहे.

याशिवाय, देशभरात गेल्या काही आठवड्यांमध्ये झालेल्या हत्यांची लष्कर स्वत: चौकशी करेल, असंही झमन यावेळी म्हणाले. याशिवाय, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी आंदोलन थांबवून घरी परतण्याचं आवाहन केलं आहे.
“भारताला माफ करू शकत नाही”

दरम्यान, बांगलादेशचे नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशमधील परिस्थितीसाठी भारताला जबाबदार धरलं आहे. “भारतात नियमित अंतरानं लोकशाही पद्धतीनं निवडणुका होतात. पण बांगलादेशमध्ये पारदर्शी पद्धतीने निवडणुका होत नाहीत. इथे सरकारच अस्तित्वात नाही. भारतानं बांगलादेशमध्ये पारदर्शी निवडणुकांसाठी प्रोत्साहन देणं आणि तसं न झाल्यास निषेध व्यक्त करणं या गोष्टी करायला हव्या होत्या. पण त्यांनी या गोष्टी केल्या नाहीत. आम्ही यासाठी भारताला माफ करू शकत नाही”, असं मोहम्मद युनूस म्हणाले आहेत.