शेकडो कार्यकर्त्यांसह या नेत्याचा पक्षाला रामराम;महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का

0
7

दि.१२(पीसीबी) -विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्याचं पहालाय मिळालं. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर देखील मोठ्या प्रमाणात पक्षांतर सुरू झालं आहे. महाविकास आघाडीमधील नेते महायुतीमध्ये प्रवेश करतच आहेत, मात्र आता महायुतीमधील घटक पक्षातील नेते देखील दुसऱ्या घटक पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत.

मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव मनोज राणे यांनी पक्षाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनोज राणे हे मंत्री नितेश राणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. हा भाजपसाठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी मोठा धक्का मानला जात आहे. मनोज राणे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनोज राणे यांच्या पक्षप्रवेशामुळे मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेची ताकत वाढली आहे. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

विकासाचा अजेंडा घेऊन शिवसेनेच्या संघटनात्मक कामात सक्रिय होणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू केलं आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी मनोज राणे यांनी दिली आहे.दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था या महायुती म्हणूनच लढवल्या जाणार असल्याचं अनेकदा महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र तरी देखील पक्षप्रवेश सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अजूनही महाविकास आघाडीचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती होणार असल्याची देखील चर्चा सुरू आहे, त्यामुळे या निवडणुकीबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.