शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने महिलेची ३५ लाखांची फसवणूक

0
209

बाणेर, दि. ५ (पीसीबी) – शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने महिलेकडून सुरुवातीला ३१ लाख ६० हजार रुपये घेतले. त्यानंतर गुंतवलेली रक्कम काढण्यासाठी आणखी चार लाख रुपये घेत फसवणूक केली. ही घटना २२ फेब्रुवारी ते १३ मार्च या कालावधीत बाणेर येथे घडली.

Schoder Academy VIp34 या व्हाटस अप ग्रुपचे ऍडमिन आणि अन्य लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीस ट्रेडिंग क्लासेस आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल असे आमिष दाखवले. त्यातून महिलेकडून ३१ लाख ६० हजार रुपये गुंतवणूक करून घेतली. त्यानंतर महिलेने गुंतवलेल्या रकमेवरील परतावा मागितला असता गुंतवलेली रक्कम काढण्यासाठी आणखी चार लाख रुपये भरण्यास सांगितले. महिलेने तेही पैसे भरले असता आरोपींनी त्यांना कोणतीही रक्कम अथवा परतावा न देता त्यांची ३५ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.