शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

0
187

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) -शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास भाग पडून आर्थिक परताव्याचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने अटक केली.

विकास नेमीनाथ चव्हाण (वय 43, रा. गणेश नगर, नवी सांगवी), प्रदीप कृष्णा लाड (वय 32, रा. पिंपळे गुरव, सांगवी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील एक महिला फेसबुकवर पोस्ट बघत असताना तिला आयबीकेआर क्रेसेट अकादमी गोल्डमन सच हा व्हाटसअप ग्रुप दिसला. महिला त्या ग्रुपला जॉईन झाली. तिथे असलेल्या लोकांना रोजच्या रोज गुंतवणुकीवर नफा होत असल्याचे दिसले. त्यामुळे महिलेने आयबीकेआर सेक्युरिटीज या कंपनीत पैसे गुंतवण्यास तयारी दर्शवली.

त्यांनतर आरोपींनी महिलेला एक लिंक पाठवून अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यावर महिलेने केलेली गुंतवणूक आणि त्यावर झालेला नफा दिसत होता. मात्र ते पैसे काढता येत नव्हते. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने महिलेने याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. महिलेची 10 लाख 69 हजार 575 रुपयांची फसवणूक झाली होती.

हा गुन्हा सायबर सेलकडे वर्ग करण्यात आला. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपींची ओळखत पटवली. त्यांना सांगवी परिसरातून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत.

फिर्यादी महिलेने आरोपी आणि इतर एकूण 11 बँक खात्यावर पैसे भरले आहेत. त्या खात्यांची चौकशी केली असता त्यावर तब्बल 50 कोटी रुपयांहून अधिक व्यवहार झाल्याचे समोर आले. आरोपींविरोधात संपूर्ण भारतात 20 तक्रारी आल्या आहेत. त्यांच्यावर यापूर्वी देखील अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.