शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत 36 लाखांची फसवणूक

0
401

हिंजवडी, दि. १४ (पीसीबी) – शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्यास सांगत त्यासाठी वारंवार पैसे घेत एका व्यक्तीची 36 लाख 67 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 29 डिसेंबर ते 27 फेब्रुवारी या कालावधीत घडली.

पंकज प्रभाकर तेरकर (वय 39, रा. माण, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी 13 मार्च रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादी पंकज यांना एका ग्रुपमध्ये घेतले. त्यांना ट्रेडिंग बाबत मार्गदर्शन करण्याचा बहाणा करून एक लिंक पाठवली. तिथे पंकज यांना रजिस्ट्रेशन करण्यास भाग पाडले. त्यानंतर प्रथम 30 हजार रुपये गुंतवण्यास सांगितले. पंकज यांनी एका युपीआय आयडीवर पैसे पाठवले असता त्यांना 20 हजार रुपये फायदा झाल्याचे सांगितले.

त्यामुळे पंकज यांनी पुन्हा गुंतवणूक केली. आरोपी महिलेने पंकज यांना वेळोवेळी गुंतवणूक करण्यास सांगितले. दरम्यान त्यांना 54 लाख 39 हजार रुपये गुंतवण्यास सांगितले. मात्र तेवढे पैसे त्यांच्याकडे नसल्याने पंकज यांनी यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र ते बाहेर पडले तर त्यांनी आतापर्यंत मिळवलेले पैसे फ्रीज होतील. तसेच शेअर मार्केट मध्ये क्रेडिड डिफॉल्टर व्हाल, अशी भीती घालून त्यांना पुन्हा गुंतवणूक करण्यास सांगितले. पंकज यांनी वेळोवेळी एकूण 36 लाख 67 हजार रुपये गुंतवले. ते पैसे त्यांना परत न करता त्यांची फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.