शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

0
94

पिंपरी-चिंचवड सायबर सेलची कामगिरी

चिंचवड, दि. 5 (प्रतिनिधी) – नागरिकांना शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगून त्यांना जास्त नफ्याचे आमिष दाखवत त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवड सायबर सेलने अटक केली आहे. त्यांचा कर्जत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात सहभाग आढळल्याने दोघांनाही कर्जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सतीश सुरेश बुंदेले (रा. लिंक रोड, चिंचवड), परेश गुलाब बिरदवडे (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड सायबर सेलचे पोलीस अंमलदार सुरज शिंदे यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती दररोज वेगवेगळ्या व्यक्तींना बँकेत घेऊन येतो आणि त्यांचे खाते सुरु करून घेतो. त्याच्याबाबत संशय आल्याने पोलिसांनी संबंधित बँक खातेधारकाची माहिती काढली. खाते धारक सतीश बुंदेले याचा ठावठिकाणा शोधून त्याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, त्याचा मित्र परेश गुलाब बिरदवडे याने बँकेत खाते सुरु करण्यास सांगितले होते. खाते सुरु करण्यासाठी परेश याच्याकडून सतीश याने ऑनलाईन माध्यमातून पैसे देखील घेतले होते. पोलिसांनी परेश बिरदवडे याला ताब्यात घेतले.

दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी कर्जत येथील एका व्यक्तीला शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवण्यास सांगून जास्त पैसे मिळतील असे आमिष दाखवले. त्यातून त्या व्यक्तीची 11 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केली होती. या गुन्ह्यात दोघांचा सहभाग निष्पन्न झाल्याने दोघांना कर्जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या गुन्ह्याचा समांतर तपास पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी केला. आरोपींनी वेगवेगळे बँक खाते सायबर फसवणूक करण्यासाठी वापरले असून आरोपींनी काढलेल्या खात्यांबाबत भारतातून 40 तक्रारी आलेल्या आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे, पोलीस अंमलदार दीपक भोसले, अतुल लोखंडे, नितेश बिचेवार, सुरज शिंदे यांच्या पथकाने केली आहे.