भविष्यातील अडचणी आणि आर्थिक गरजा ओळखून गुंतवणूक करा – नंदकुमार काकिर्डे
इन्फनाइट मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे दिमाखदार उद्घाटन
पुणे, दि. ५ बचतीबरोबरच सर्वांनी शेअर मार्केट मधील गुंतवणूक व व्यावहारिक कौशल्य समजून घ्यावे. यातूनच आर्थिक साक्षरता येते. शेअर बाजारात धोका आहे, परंतु देशात शंभर वर्षांपासून जास्त काळ झाला शेअर मार्केटमध्ये व्यवहार सुरू आहेत. वाढत्या महागाईशी आपल्या बचतीचे सूत्र जुळले पाहिजे. यासाठी भविष्यातील आपल्या अडचणी आणि आर्थिक गरजा ओळखून गुंतवणूक करावी असा सल्ला जेष्ठ अर्थ सल्लागार नंदकुमार काकिर्डे यांनी दिला.
इन्फनाइट मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या खराडी, पुणे येथील शाखेच्या उद्घाटन प्रसंगी काकिर्डे बोलत होते. यावेळी संस्थेचे चेअरमन नवनाथ आवताडे, आत्मनिर्भर भारतचे दूत मनीष जाधव, येस बँकेचे उपाध्यक्ष समीर मुळे, सामाजिक कार्यकर्ते राज देशमुख, संचालक विनायक मराठे, गौरव सुखदेवे, निलेश ढेरे, संस्थेचे पदाधिकारी, ठेवीदार बहुसंख्येने उपस्थित होते.
इन्फनाइट मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या ॲपचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी काकिर्डे यांनी सांगितले की, महिलांना सोन्यात गुंतवणूक करणे आवडते. परंतु भाववाढ झाल्यानंतर सोने विकण्यास महिलांचा विरोध असतो. एकूण बचतीतील दहा ते पंधरा टक्के सोन्यामध्ये गुंतवणूक करावी व इतर गुंतवणूक म्युच्युअल फंड, शेअर मार्केटमध्ये करावी. पोस्टात, बँकेत, मुदत ठेवीत तीन ते सात टक्के वार्षिक व्याज मिळते. वाढत्या महागाईने पैशाचे मूल्य कमी होते. आता इन्फनाइट मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून राज्यात आर्थिक साक्षरतेची चळवळ सुरू होईल असा विश्वास वाटतो. महिलांमध्ये आर्थिक गुंतवणुकीबाबत निर्णय क्षमता निर्माण करण्यासाठी या संस्थेने पुढाकार घ्यावा असे आवाहन नंदकुमार काकिर्डे यांनी केले.
मनीष जाधव यांनी सांगितले की, समाजामध्ये आर्थिक साक्षरतेची उणीव आहे, ती भरून काढण्याचे काम ही संस्था नक्कीच करेल आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होण्यास चालना मिळेल.
स्वागत, प्रास्ताविक करताना संस्थेचे चेअरमन नवनाथ आवताडे यांनी सांगितले की, सामान्य माणसाला बचत आणि गुंतवणुकी बाबत ग्राहकाच्या दारात जाऊन सेवा आणि मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने ही संस्था सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा व श्रीगोंदा येथे शाखा सुरू करण्यात आल्या असून आगामी काळात एकूण ११ शाखा सुरू करण्याचे नियोजन आहे. आर्थिक साक्षरतेमुळे आणि आर्थिक समृद्धीमुळे सामाजिक प्रतिष्ठा व सुरक्षितता प्राप्त होते. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवली तर गुंतवणूकदार विश्वास ठेवतात याचा अनुभव आहे. सामान्य व्यक्तीने आपल्या मासिक उत्पन्नाच्या दहा टक्के योग्य बचत व योग्य गुंतवणूक केली, तर सामान्य व्यक्ती देखील करोडपती बनू शकतो. आतापर्यंत मिळालेल्या अनुभवातून सामान्य गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षर आणि सक्षम करण्यासाठी आपण नेत्रदीपक कामगिरी करू असेही यावेळी आवताडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन संदीप दरेकर, पांडुरंग खामकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केले.
सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे, आभार संचालक प्रसाद देशमुख यांनी मानले.